Ahilyanagar News : अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागात घोटाळ्यांवर घोटाळे सुरू आहेत. सरकारी रक्कम खासगी कामासाठी वापरल्याच्या घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता सन 2022-23 मध्ये पीएफएमएस प्रणालीचा डाटा नष्ट केला. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगाच्या खात्यातून वर्ग करण्यात आलेल्या अनेक रकमांचा हिशोब लागत नाही.
हा मोठा घोटाळा असून, त्याची चौकशी राज्य आरोग्य विभागाच्या नाशिक आरोग्यसेवा उपसंचालकांच्या समितीने सुरू केली आहे. समितीने आज अहिल्यानगर महापालिकेत धडक देत, चौकशी सुरू केल्याने आरोग्य विभागातील अनेक अधिकारी रडारवर असल्याची चर्चा रंगली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील सरकारी रकमा खासगी खात्यावर वगळण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वैद्यकीय आरोग्यधिकारी डाॅ. अनिल बोरगे आणि विजयकुमार रणदिवे यांना अटक झाली. पोलिस (Police) कोठडीत असलेले बोरगे आणि रणदिवे यांना जामीन झाला आहे. परंतु या अपहरानंतर आरोग्य विभागातील इतर घोटाळे देखील चर्चेत आले आहेत.
महापालिकेच्या अहवालानंतर राज्य आरोग्यसेवा विभागाने या घोटाळ्याची चौकशीसाठी स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. नाशिकच्या (Nashik) आरोग्यसेवा उपसंचालक कार्यालयाचे सहायक अधीक्षक गणेश चव्हाण, कार्यक्रम व्यवस्थापक पंकज चव्हाण, जिल्हा परिषदेचे लेखा व्यवस्थापक उदय देशपांडे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे वरिष्ठ लिपिक विजय बहिरम यांचा चौकशी समितीत समावेश आहे.
या समितीने आज अहिल्यानगर महापालिकेत येत चौकशी केली. ही समिती आठ दिवसांत चौकशी करून त्याचा अहवाल आरोग्यसेवा उपसंचालकांना सादर करणार आहे. समितीला प्राथमिक चौकशीत 16 लाख रुपयांच्या अपहार आढळला आहे. 2022-23 मध्ये आरोग्य विभागाला आॅनलाईन निधी वितरित केलेल्या प्रणालीचा (पीएफएमएस) डाटाच नष्ट केल्याचे समितीच्या चौकशीत समोर आले आहे.
'पीएफएमएस' प्रणालीतील डाटा नष्ट केल्याने वित्त आयोग खात्यातून वर्ग करण्यात आलेल्या अनेक रकमांचा हिशोब लागत नाही. यात सात फेब्रुवारी 2023 रोजी 11 लाख, नऊ फेब्रुवारी 2023 ला 16 लाख 50 हजार रुपये वैयक्तिक बँक खात्यात पीएफएमएस प्रणालीचा वापर करून शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवे आणि वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल बोरगे यांचा लाॅगईन वापरून अपहार केल्याचे समितीला आढळले आहे.
या रकमा 'एटीएम'मधून काढून अनेक व्यक्तींच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे तसेच 'पेटीएम', 'यूपीआय', 'फोन-पे' आदी माध्यमातून खासगी किंवा वैयक्तिक स्वरुपाची खरेदी केल्याचे समोर आले आहे. आरोग्यसेवा उपसंचालकांच्या समितीने चौकशी सुरू केल्याने अनेक अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागात स्मशान शांतता पसरली आहे. अधिकारी, कर्मचारी एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.