Nashik Kumbh Mela Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : गर्दी, आग, रासायनिक गळती... कुंभमेळ्यातील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासनाची तयारी

Nashik-Trimbakeshwar Kumbh 2027 Disaster Management Preparation : सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांची गर्दी, आग, रासायनिक गळती यांसारख्या संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. 'शून्य अपघात' हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली आहे. या नियोजनात 'शून्य अपघात' हेच मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Nashik-Trimbakeshwar Kumbh 2027 Disaster Management Preparation : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध शासकीय यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत संबंधित यंत्रणांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे सादरीकरणाद्वारे आपापले विभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडे मांडले. सादर करण्यात आलेल्या आराखड्यांमधील विविध बाबी, संभाव्य आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणचे अतिरिक्त आयुक्त तथा अपर जिल्हाधिकारी उदय किसवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत, कुंभमेळा तहसीलदार मकरंद दिवाकर यांच्यासह विविध विभागांचे कार्यकारी अभियंते, नाशिक महानगरपालिकेतील संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख आणि सल्लागार उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिकांची उपस्थिती लक्षात घेता गर्दीचे व्यवस्थापन, संभाव्य आपत्तींचे पूर्वानुमान, जोखीम ओळखणे आणि त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक यंत्रणा, अग्निसुरक्षा, पाणीपुरवठ्याची अखंडित उपलब्धता, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच पायाभूत सुविधांची सुरक्षितता यासंबंधीच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

याशिवाय, आपत्ती व्यवस्थापनासाठी सध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ, वाहने आणि यंत्रसामग्री तसेच कुंभमेळ्याच्या कालावधीत आवश्यक असणारे अतिरिक्त मनुष्यबळ, वाहने व यंत्रसामग्री याबाबतही चर्चा करण्यात आली. उपलब्ध संसाधने आणि अपेक्षित गरज यांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त व्यवस्था करणे, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने करावयाची स्थापत्यविषयक कामे तसेच गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला. यासोबतच अंतर्गत व बाह्य वाहनतळांचे नियोजन, वाहनांची सुलभ ये-जा, पार्किंग क्षमतेचे व्यवस्थापन आणि वाहनतळांपासून भाविकांच्या सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक व्यवस्थांबाबतही चर्चा करण्यात आली.

औद्योगिक सुरक्षिततेच्या अनुषंगाने कारखान्यांमधील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी, धोकादायक रसायने व वायूंचे उत्पादन, साठवणूक आणि हाताळणी, तसेच अशा रसायने व वायूंच्या वाहतुकीदरम्यान घ्यावयाची खबरदारी यावरही सादरीकरणातून माहिती मांडण्यात आली. रसायने किंवा वायूंची गळती, आग अथवा स्फोट यांसारख्या संभाव्य घटनांचा विचार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरक्षितता मानकांचे पालन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची तयारी ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट असणे, आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्रीची उपलब्धता, आपत्कालीन संपर्क व्यवस्था, माहितीचे वेळेत आदानप्रदान आणि परस्पर समन्वय यासंबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. संभाव्य अडचणींची आधीच ओळख करून त्यावर उपाययोजना निश्चित करणे, आवश्यक प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सरावाद्वारे यंत्रणांची तयारी तपासणे आणि आपत्तीच्या प्रसंगी सेवा पूर्ववत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवणे यांचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे सुरक्षित आणि सुरळीत आयोजन करण्यासाठी आपत्तीपूर्व नियोजनाला विशेष महत्त्व असून, सर्व संबंधित यंत्रणांनी आपापल्या जबाबदाऱ्यांनुसार कृती आराखडे अधिक सक्षम करावेत आणि परस्पर समन्वयातून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज राहावे, यावर बैठकीत भर देण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत स्वयंसेवकांची आवश्यकता विविध विभागांनी नोंदविल्यास, मनुष्यबळाची उपलब्धतेच्या अनुषंगाने, प्राधिकरण स्तरावर कार्यान्वयन केले जाणार असल्याचे सर्व् विभागांच्या निदर्शनास आणुन देण्यात आले.

दरम्यान, मंगळवार दि. २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी येत्या १५ डिसेंबर २०२६ पूर्वी सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याची दक्षता विभागप्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश दिले. या संपूर्ण नियोजनात 'शून्य अपघात' हेच मुख्य उद्दिष्ट (केंद्रबिंदू) असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT