Yellow water Nashik : सिंहस्थ कुंभमेळा जवळ आला असताना नाशिकमध्ये भीषण रासायनिक संकट येऊन ठेपलं आहे. नाशिककरांमध्ये सध्या पिपळ्या पाण्याची दहशत निर्माण झाली आहे. कारण या पाण्याची खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता, त्यात सर्वात घातक व कर्करोगजन्य मानले जाणारे हेक्साव्हॅलेंट क्रोमियम सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल १००० पटींहून अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नाशिकच्या अंबड एमआयडीसी'ला लागून असलेल्या दत्तनगर, मारुती संकुल, तुळजाभवानीनगरसह आसपासच्या परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरातील भूजल अक्षरक्ष:विषारी बनला असून बोअरवेलमधून रसायनयुक्त पिवळे पाणी येत आहे. या पाण्यामुळे परिसरातील लोकांना त्वचेचे गंभीर विकार जडले आहेत. या परिसरातील सुमारे २५ हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे. परिसरातील मुलांना शाळेत येण्यास देखील मनाई करण्यात येत असल्याचं नागरिकांनी सांगितलं.
स्थानिक पर्यावरणप्रेमी राजेश पंडित, रोशन केदार यांनी या भागातील पाण्याचे नमुने संकलित करून एका मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते.त्याचा धक्कादायक अहवाल हाती लागला, या पाण्यात ५०.५ मि.ग्रॅ प्रति लिटर क्रोमियम आढळले आहे. तसेच यामध्ये ५०.३ मि.ग्रॅ प्रति लिटर याप्रमाणे अत्यंत घातक व कर्करोगाला निमंत्रण देणारे हेक्साव्हॅलेंट क्रोमियम हजारपटीपेक्षा जास्त प्रमाणात आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे.
गुरुवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूषित पाणी असलेल्या परिसरात प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नागरिकांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दूषित पाण्यामुळे त्वचाविकारांसह आरोग्यविषय त्रास होत असल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या.
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी ऐकून मंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही आणि निष्काळजीपणा करणाऱ्या कोणत्याही उद्योगाला पाठीशी घातले जाणार नाही, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा आहे. कोट्यावधी भाविक नाशिकमध्ये त्या निमित्ताने येतील. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याची तयारी सुरु असून निर्माण झालेला पाणीप्रदूषणाचा हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे. अशा परिस्थितीत दूषित पाणी नदीत मिसळत असल्याचा आरोप होत असून, तसे होणार नाही याची काळजी स्थानिक प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.