Ex MLA Rajiv Deshmukh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP News; कापसाला दहा हजारांचा भाव द्या!

Sampat Devgire

चाळीसगाव : (Jalgaon) शेतकऱ्यांनी (Farmers) मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कापसाला भाव मिळत नसल्याने शासनाने कापसाची दहा हजारांहून अधिक दराने प्रती क्‍विंटल खरेदी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (NCP) माजी आमदार राजीव देशमुख (Rajeev Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. (NCP deemand 10k rupees per quintel rate for cotton)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करून दौरे व घोषणा करण्यातच व्यस्त असल्याची टिका करण्यात आली.

शेतकऱ्यांनी भाव मिळेल, या आशेने घराघरांत कापूस साठवून ठेवला आहे. जास्त दिवस झाल्याने त्यात पिसवा पडल्या असून घरातील सर्वांच्या अंगाला खाजरे सुटले आहे. ज्यामुळे दवाखाने फुल्ल झाले आहेत. कमी भावात कापूस विकून हातात काहीच येत नसल्याने शिल्लक वेचलेल्या कापसाची झाडे घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज निर्दशने करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या घरात जेव्हा कापूस येतो, तेव्हाच कापसाचे भाव गडगडतात. यावर्षी देखील शेतकऱ्याच्या घरात कापूस येण्यापूर्वी १४ ते १६ हजार रुपये प्रती क्विंटल कापसाला भाव होता. जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कापूस आला, त्यावेळी मात्र प्रती क्विंटल सात हजार रुपयांपर्यंतचाच भाव आला. अगोदरच अतिवृष्टी व नैसर्गिक संकटांमुळे शेतमालाचे उत्पादन कमी होत आहे. त्यात शेतकऱ्यांना पेरणीचा खर्च व मजूर मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रोजचे जगणे व पोट भरणे कठीण झाल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

केंद्र सरकारने आपले आयात व निर्यात धोरण व्यवस्थित राबविल्यास शेतकऱ्यांच्या कापसाला प्रती क्विंटल दहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळू शकतो. त्यामुळे कापसाला हा दर मिळावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रस्त्यावर उतरुन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल देशमुख, पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, किसनराव जोर्वेकर, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, विष्णू चकोर, नगरसेवक भगवान पाटील, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सदशिव गवळी, युवक तालुकाध्यक्ष मोहित भोसले, शहराध्यक्ष शुभम पवार आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT