Eknath Khadse News
Eknath Khadse News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News : खडसेंच्या वर्चस्वाला धक्का; राष्ट्रवादीच्याच नेत्याने केला करेक्ट कार्यक्रम : काय घडले जिल्हा बॅंकेत...

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon District Bank : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार हे एका मताने निवडून आले. त्यांना शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपचे समर्थन मिळाल्याचे सांगितले जात आहे.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटानेही खडसे यांना धक्का दिल्याची चर्चा आहे. आघाडीकडे स्पष्ट बहुमत असतानाही अधिकृत उमेदवार पडला आणि राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार विजयी झाले. यामुळे जळगाव जिल्ह्यात खडसे यांच्या वर्चस्वाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यात रवींद्र पाटील यांना अध्यक्षपदाची उमेदवार जाहीर करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवारही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. उपाध्यक्षपदासाठी शिंदे गटाकडून अमोल चिमणराव पाटील यांना संधी देण्यात आली होती.

राष्ट्रवादीत उमेदवारीवरून एकमत न झाल्याने अखेर निवडणूक घ्यावी लागली. त्यात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांना १० मते मिळाली आणि राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांना ११ मते मिळाली. एक मताने संजय पवार यांनी अध्यक्षपदासाठी बाजी मारली. प्रत्यक्षात महाविकास आघाडीकडे १५ मते होती. तरीही रवींद्र पाटील यांचा पराभव झाला. पाटील यांची उमेदवारी खडसे यांनी जाहीर केली होती, त्यामुळे हा खडसेंसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

या निवडणुकीत भाजप, शिंदे गट यांनी एकत्र येत खडसेंना धक्का दिला. त्यांना ठाकरे गटाच्या संचालकाची मदत मिळाल्याची चर्चा जिल्हाच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याला अधिकृत पुष्टी मिळू शकलेली नाही. दुसरीकडे, महाविकास आघाडीची मते फुटल्याचे उघड आहे. कारण बहुमत पाठीशी असूनही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला. त्यामुळे एकनाथ खडसे विरुद्ध सगळे, असा राजकीय सामना जळगावमध्ये झाल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT