Chandrakant Bavankule
Chandrakant Bavankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP News: बावनकुळे यांनी आधी आपली राजकीय उंची तपासावी!

Sampat Devgire

धुळे : जिल्हा (Dhule) दौऱ्यावर आलेले भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टिकाटिप्पणी करताना पत्रकार परिषदेत जीभ घसरली. नेते गेले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला, असे विधान त्यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी श्री. बावनकुळे यांच्या वादग्रस्त विधानाचा धिक्कार व तीव्र शब्दात निषेध केला. (Dhule Ncp leaders angry on Bavankule`s statement)

बावनकुळेंच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादीच्या येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचा नामोल्लेख न करता श्री. बावनकुळे यांनी वादग्रस्त विधान केल्याने त्याचा येथे राष्ट्रवादीतर्फे निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादीतर्फे येथील ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे व शहराध्यक्ष रणजित भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे. श्री. बावनकुळे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याचा निषेध करतो. श्री. बावनकुळे यांनी स्वतःचे घर सांभाळावे, दुसऱ्याच्या घरात डोकावू नये. राष्ट्रवादीच्या नेत्याबाबत असे अनुचित उद्‌गार काढणे शोभनीय नाही. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच बावनकुळे यांनी खालच्या पातळीचे विधान केले. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचा धिक्कार करतो. श्री. बावनकुळे यांची एवढी राजकीय उंची नाही की ते राष्ट्रवादीवर, या पक्षाच्या श्रध्दास्थान असलेल्या नेत्यावर बोलू शकतात. ज्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालेले नाही, त्यांनी ५० वर्षांचा दीर्घ अनुभव असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याविषयी बोलू नये. प्रदेशाध्यक्ष पदानुसार सभ्यता बाळगावी. धुळ्यातील त्यांच्या दौऱ्यात आजूबाजूला असलेले सर्वच नेते हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत गेलेले आहेत. त्याचाही विचार श्री. बावनकुळे यांनी करावा.

राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जातीधर्माला सोबत चालणारा पक्ष असून महाराष्ट्रातील सामान्य जनता, शेतकरी, कर्मचारी, मजूर यांच्यासाठी झटणारा पक्ष आहे. नव्यानेच प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यामुळे श्री. बावनकुळे यांनी वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी, असे अशोभनीय विधान केले आहे. यापुढे त्यांनी किंवा भाजपमधून असे चुकीचे विधान केले गेले तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सोनवणे, शहराध्यक्ष भोसले यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा यांनी श्री. बावनकुळे यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे.

बावनकुळेचे ते विधान

राष्ट्रवादी काँग्रेसला व्हीजन नाही. हा पक्ष म्हणजे नेत्याने तयार केलेली टोळी आहे. जिथे नेते तिथे राष्ट्रवादी आहे. नेते गेले की राष्ट्रवादी गेली, असे विधान श्री. बावनकुळे यांनी धुळे येथे पत्रकार परिषदेत केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT