Avinash Adik News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला. नते, कार्यकर्ते यांना त्यातून सावरण्यास बराच कालावधी लागणार आहे. तशा प्रतिक्रीया सर्व थरातून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवसांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी पुढील पर्यायी व्यवस्थेसाठी चर्चा सुरू केली होती. याबाबत काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अतिशय वेगाने घडामोडी घडल्या.
शुक्रवारी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षाची जबाबदारी स्विकारली. विधानभवनात झालेल्या बैठकीत पक्षाच्या सर्व आमदारांनी एकमताने तसा ठराव केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेली पक्षाची जबाबदारी सोपवावी यासाठी सह्यांची मोहीम राबवली.
अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली. त्याबाबत राजकीय विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती. समाज माध्यमांवर देखील त्याबाबत टिका झाली होती.
यावर पक्षाचे नेते अविनाश आदिक यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, कुटुंबाचा प्रमुख गेल्यावर ते कुटुंब नेतृत्वाशिवाय आणि दिशाहीन राहू शकत नाही. अजितदादा पवार हे आमच्या हृदयाचे राजे होते. राजा गेल्यावर, अराजकता येऊ नये म्हणून लगेच उत्तराधिकारी ठरवला जातो.
त्या अत्यंत दुःखाच्या क्षणीही श्रीमती सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. यासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सरकारमधील अनेक महत्त्वाची मंत्रालये आहेत. त्यामुळे जनतेच्या हिताचे कार्य थांबू नये, हे आवश्यक होते.
श्रीमती पवार यांच्या शपथविधीला विरोध करणारे हे स्वार्थी, हितसंबंध असलेले लोक आहेत. ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अराजकतेत कोसळलेला पाहायचा होता. सत्ता हस्तगत करण्याची संधी दिसताच झडप घालणारे हे लोक गिधाडांसारखे आहेत, या शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण अजित पवार यांच्या मार्गावर व दूरदृष्टीनुसार पुढे जाणे आवश्यक आहे. त्यासाठी सातत्य टिकवून ठेवणारी सर्वोत्तम व्यक्ती हवी होती. पक्षाचे आमदार, नेते आणि कार्यकर्ते यांची इच्छा होती की, पक्षात नेतृत्वाचा अभाव आहे, असे बोलण्याची संधी नकारात्मक शक्तींना संधी मिळू नये.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.