Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ खडसे नागरिकांच्या प्रश्नावर कडाडले!

Sampat Devgire

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आता सामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत. शहरातील (Jalgaon) रखडलेल्या प्रकल्पांमुळे नागरिकांत संताप आहे. या दिर्घकाळ रेंगाळलेल्या कामांच्या कंत्राटदारांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे. (Eknath Khadse meet Collector for action against contractors)

शहरातील शिवाजीनगर पुलाच्या कामात दिरंगाई होत आहे, औरंगाबाद रस्त्याचे जळगावजवळचे काम रखडले आहे. याबाबत नागरिकांनी आंदोलन केले, तक्रारी केल्या परंतु त्याचे काम अद्यापही संथगतीने सुरू आहे. या प्रकरणी संबंधित मक्तेदारावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.

या वेळी आमदार खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, की शिवाजीनगर पुलाचे काम चार वर्षांपासून रेंगाळलेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रात होत आहे. नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी पुलाच्या कामासाठी वारंवार आंदोलनेही केली आहेत. मात्र प्रशासन व मक्तेदार त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. मक्तेदारावर कारवाईसुद्धा केली जात नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे.

औरंगाबाद महामार्गाचीही दुरावस्था

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर जळगावनजीक दोन किलोमीटर रस्त्याच्या कामाबाबतही त्यांनी तक्रार केली. ते म्हणाले, की शहरातील अजिंठा चौफुली ते रेमंडपर्यंतच्या रस्त्याचे काम वर्षभरापासून झालेले नाही. या रस्त्यावरून वाहतूक करणेही कठीण झाले आहे. रस्त्याच्या मक्तेदारावरही कारवाई होत नाही. उलट त्यांना मुदतवाढ दिली जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. जिल्हाधिकारी म्हणून आपण तातडीने या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे. याशिवाय शहरात आकाशवाणी चौक व अजिंठा चौफुली येथे सर्कल करण्यात आली आहेत. मात्र त्या ठिकाणीही अपघात होत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण त्याबाबत कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

वाळूमाफियांवर एमपीडीए लावा

वाळूमाफिया मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा करीत असल्याचा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. अवैध वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांच्या गाड्या पकडल्या आहेत त्यांच्यावर तरी कारवाई करा व त्यांना एमपीडीए लावा, अशी मागणीही त्यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांतर्फे आज बैठक

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शहरातील व जिल्ह्यातील प्रश्‍नांबाबत तातडीची बैठक मंगळवारी (ता. २६) बोलविली आहे. यात महापालिकेचे अधिकारी, महामार्ग विभागाचे अधिकारी, मक्तेदार व पोलिस अधिकारी यांना पाचारण करण्यात आल्याचे सांगण्यत आले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT