Eknath Khadse and Girish Mahajan
Eknath Khadse and Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

बुधवार पेठेत दगडूशेठ गणपतीही आहे! खडसेंची महाजनांना गुगली

कैलास शिंदे :सरकारनामा ब्युरो

जळगाव : पुण्याच्या बुधवार पेठेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. त्या ठिकाणी महाजन यांनी दर्शन घ्यावे, असे मी सुचवले होते. परंतु, 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' याप्रमाणे त्यांच्या मनात होते तेच त्यांना दिसले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपचे (BJP) माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यात दोन दिवसांपासून जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. दोघेही एकमेकांवर शाब्दिक हल्ले करीत आहे. गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवावे, असा टोला खडसे यांनी लगावला होता. त्यावर सडक्या डोक्यातील विचार, असा टोला महाजन यांनी खडसे यांना लगावला होता.

आता खडसे यांनी बुधवार पेठेतील आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुण्याच्या बुधवार पेठेत दगडूशेठ गणपती मंदिर आहे. त्या ठिकाणी जाऊन महाजन यांनी दर्शन घ्यावे, असे मला सुचवायचे होते. परंतु, तुमच्या मनात असते तेच तुम्हाला दिसते. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' असेच ते आहे. माझा दृष्टिकोन चांगला आहे. गिरीश महाजन यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घावे त्यांना त्याचा लाभ होईल.

खडसे आणि महाजन यांच्यातील शाब्दिक युद्धाची चर्चा राज्यभरात सुरू आहे. या वादात शिवसेना नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही उडी घेतली आहे. ते म्हणाले की, या दोघांचे हे जुने वाद आहेत. त्यात मला पडायचे नाही. मात्र, दोघांनी वाद वाढवल्यास या वादामुळे जिल्ह्याचे भले होणार नाही, असे मला वाटते. या उलट सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर जिल्ह्याचा विकास होईल.

वादाची सुरवात कुठून?

खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी, सक्तवसुली संचनालयाकडून (ED) अटक होणार असल्याच्या भीतीने खडसे यांना कोरोना झाल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला होता. नंतर महाजन यांना कोरोना संसर्ग होताच खडसे यांनी त्याचे उट्टे काढले होते. अटकेच्या भीतीने महाजन यांना कोरोना झाला, असा टोला खडसेंनी लगावला होता. त्यावर महाजन यांनी खडसे यांना ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखवावे, अशी टीका केली. यानंतर खडसे यांनी गिरीशभाऊ यांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे, असा टोला लगावला. त्याला पुन्हा महाजन यांनीही प्रत्युत्तर दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT