Bhaskarrao Bankar & Dilip Bankar
Bhaskarrao Bankar & Dilip Bankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना शिवसेनेकडून धोबीपछाड!

Sampat Devgire

पिंपळगाव बसवंत : निफाड (Niphad) तालुक्यासाठी लक्षवेधी ठरलेल्या पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांना माजी सरपंच, शिवसेनेचे भास्करराव बनकर (Bhaskarrao Bankar) यांनी धोबीपछाड दिला. या निवडणुकीत विविध सत्ताकेंद्र ताब्यात असलेल्या आमदार बनकर हा जोरदार राजकीय धक्का ठरला. मतदारांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे उलटे फिरवत शिवसेनेचा (NCP) भगवा फडकविला. (NCP MLA Dilip Bankar defeat on home ground politics)

आमदार बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनलला अवघ्या चार जागा मिळाल्या. फाजील आत्मविश्वास व पारंपारीक मतदार विरोधात गेल्याने त्यांच्या गटाचा होमपीचवर पराभव झाला. यानिमित्ताने मतदारांनी शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम करताना पिंपळगाव बसवंतच्या राजकारणात गेले काही दिवस बॅकफुटवर गेलेल्या भास्करराव बनकर यांना पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.

गेल्या दहा दिवसांपासून या सोसायटीच्या निवडणुकीसाठी नेत्यांमध्ये डावपेच व मतदारांच्या गाठीभेटी सुरु होत्या. रविवारी झालेल्या या निवडणुकीत एक हजार १६१ मतदारांनी हक्क बजावला. मतदान सुरु असताना देखील चुरस असल्याने मतदान केद्रांवर सुरवातीला दोन्ही गटांत शाब्दीक चकमकी झाल्या. मतदान संपल्यावर सायंकाळी लगेचच मतमोजणी झाली. पॅनल टू पॅनल मतांच्या गठ्ठ्यात माजी सरपंच बनकर यांच्या नम्रता पॅनलने २० मतांची मुसंडी मारली. त्याच वेळी निकाल स्पष्ट झाला. सुमारे पाचशे मतदारांनी क्रॉस व्होटींग केले. यामध्ये मोरे परिवारातील मतदारांनी दोन्ही पॅनलमधील उमेदवारांनांच पसंती दिली.

या निवडणुकीत आमदार बनकर, निफाड साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तानाजी बनकर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक विश्‍वासराव मोरे अशा तगड्या नेत्यांच्या फळीतील व्होटबँकेला भास्करराव बनकर यांनी गनिमीकाव्याने खिंडार पाडले. स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे त्यांनी प्रचार केला. याउलट शेतकरी विकासचे नेते, उमेदवार व कार्यकर्ते गाफील राहिले असावे, असे दिसते.

ॲन्टीइन्कमबन्सीचाही फटका आमदार बनकर यांच्या गटाला बसला. त्यामुळे सरासरी ७० ते १०० मतांच्या फरकाने नम्रता पॅनेलचे सहा उमेदवार विजयी झाले. अनिल बनकर हे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले. हा विजय मिळवून भास्करराव बनकर यांनी जोरदार राजकीय मुसंडी मारली आहे. एकाकी लढत देताना त्यांनी अनेक विरोधकांवर बाजी मारली.

आगामी बाजार समिती निवडणुकीच्या दुष्टीने कर्मभूमीतील सोसायटीची सत्ता गमावल्याने आमदार बनकर यांच्या गटाला जोरदार हादरा बसला आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्या फळीत प्रचाराला असलेले स्थानिक नेते चंद्रकांत खोडे, चंद्रकांत बनकर हे आमदार बनकर यांना सोसायटीच्या निवडणुकीत सोडचिठ्ठी देऊन जात यशस्वी झाले.

‘मविप्र’चे माजी संचालक दिलीप मोरे यांनी सर्वाधिक मते मिळवित जनाधार अधोरेखीत केला. ओबीसी गटातील लक्षवेधी लढतीत विनायक खोडे यांनी रामकृष्ण खोडे यांचा पराभव केला. भाजपचे युवानेते सतीश मोरे पुन्हा राजकीय पटलावर विजय मिळवत झळकले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी महेश भडांगे यांनी निकाल जाहीर करताना ‘नम्रता’च्या समर्थकांनी गुलाल उधळण व आतषबाजी करीत जल्लोष केला. पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, नितीन बनकर, केशव बनकर आदी उपस्थित होते.

विजयी उमेदवार असे,

नम्रता पॅनल : सर्वसाधारण गट- दिलीप मोरे (६६०), रामराव डेरे (६२३), चंद्रकांत बनकर (६२१), सोमनाथ मोरे (५३१), अनिल बनकर (५२५). महिला राखीव- शोभाताई बनकर (५७९), हिराबाई खोडे (५७५), ओबीसी गट- विनायक खोडे (६४२), अनुसूचित जाती-जमाती गट- आशिष बागूल (६०८).

...

शेतकरी विकास : सर्वसाधारण गट- सतीश मोरे (६५५), सुरेश खोडे (६१०), नंदू देशमाने (५५५), भटक्या जाती-जमाती गट- दत्तात्रय देवकर (६४१).

---

आमदार पदाची निष्क्रिय कारकीर्द व ग्रामपंचायतीच्या सत्तेचा उन्माद यामुळे सभासदांनी धनशक्तीचा पाडावा केला. बलाढ्य शक्तीला जनशक्तीच्या बळावर चारीमुंड्या चित केले. पिंपळगाव आगामी राजकारणाला आजचा निकाल कलाटणी देणारा आहे. संस्थेच्या हिताचे कामकाज करणार.

-भास्करराव बनकर (नेते, नम्रता पॅनल)

...

सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे. अपयशाचे आत्मचिंतन करणार आहे.

-आमदार दिलीप बनकर (नेते, शेतकरी विकास पॅनल)

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT