Sharad pawar NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Swarajya Yatra Ahmednagar : NCP शरदचंद्र पवार पक्षाचे शक्तीप्रदर्शन; शिवसेनेच्या जागेसह सहा मतदारसंघावर दावा

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजप नेतृत्वानं राज्याच्या सत्तेत यायचं असेल, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना रोखा, असं जाहीरपणे सांगत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. भाजप नेतृत्वानं राज्यातील राजकीय लढाईची दिशा ठरवली असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा झंझावात राज्यात शिवस्वराज्य यात्रेनिमित्तानं सुरूच आहे.

आता ही यात्रा अहमदनगर जिल्ह्यात उद्या गुरूवारी (ता. 26) आणि शुक्रवारी (ता. 27) शक्तीप्रदर्शन करणार आहे. यानिमित्ताने मतदारसंघातील समर्थकांशी संवाद, जाहीर सभा होणार आहे. या यात्रेनिमित्ताने नगरमध्ये बऱ्याच राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा उत्तर नगरमध्ये अकोले आणि दक्षिण नगरमध्ये शेवगाव, श्रीगोंदा, नगर शहर, राहुरी आणि पारनेर या पाच मतदार संघांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सर्व फ्रंटल सेलचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह जिल्ह्यातील खासदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, आजी-माजी आमदार, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, जिल्हा व तालुका पदाधिकारी या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होतील.

नगर शहर राजकीय उलथापालथी

शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्ष जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. नगर शहरात ही यात्रा येणार असल्यानं, तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्हं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा तुतारीवाला माणूस, अशी लढत होणार असल्याची चर्चा रंगलीय. ही यात्रेचा मुक्काम नगर शहरात असणार आहे. शुक्रवारी (ता. 27) सकाळी 10.30 वाजता नंदनवन लॉन्समध्ये (टिळकरोड) सभा होणार आहे.

विखेंच्या राहाता संघातही शक्तीप्रदर्शन

ही यात्रा शिर्डीकडे रवाना होणार असून, तिथं साईसमाधी मंदिरात दर्शन घेतल्यावर सायंकाळी 4 वाजता राहुरी येथील नवी पेठेत जुन्या ग्रामीण रुग्णालयासमोर जाहीर सभा होईल. तेथून ही यात्रा पारनेरकडे रवाना होईल. पारनेर तालुक्यातील निघोज इथं सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा होईल. तेथून ही यात्रा पुणे किंवा इस्लामपूरकडे जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात ही शिवस्वराज्य यात्रा कर्जत-जामखेड मतदार संघ आणि कोपरगाव मतदारसंघासह शिर्डी (राहाता) मतदार संघातही जाणार असून, तेथेही जाहीर सभांचे नियोजन आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांचा आठ जागांवर दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने शिवस्वराज्य यात्रा जाहीर सभा होत असलेल्या अकोले, शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदा, नगर शहर, राहुरी आणि पारनेर या सहा मतदारसंघांसह कर्जत-जामखेड आणि कोपरगाव, अशा आठ जागांवर दावा केला आहे. काँग्रेसच्या वाट्याला संगमनेर, श्रीरामपूर आणि शिर्डी (राहाता) अशा तीन जागा असल्या, तरी त्यातील शिर्डीची जागाही लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आहे व त्याबदल्यात काँग्रेसला जिल्ह्यातीलच दुसरी एखादी जागा देण्याचीही तयारी आहे. दोन्ही काँग्रेसच्या या जागा वाटपात महाविकास आघाडीचा तिसरा घटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फक्त नेवाशाच्या जागेवर बोळवण होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे पक्षाला हे कितपत मान्य होईल, याचीच उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT