Dilip Bankar & Bhaskarrao Bankar
Dilip Bankar & Bhaskarrao Bankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dilip Bankar News; आमदारकीसाठी सत्ता राखण्याचे मोठे आव्हान!

Sampat Devgire

पिंपळगाव बसवंत : नगरपरिषद की ग्रामपंचायत या वादात निवडणूक होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. मात्र प्रक्रीया सुरु झाल्यावर इच्छुकांची गर्दी झाली. त्यात (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांना आपली सत्ता राखण्याचे मोठा आव्हान आहे. तीन प्रमुख पॅनेल असले तरी शिवसेना (Shivsena) नेते भास्करराव बनकर (Bhaskarrao Bankar) यांची कल्पकता व लोकप्रियता दिलीप बनकरांच्या मार्गात अडसर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार बनकर यांच्यापुढे सत्ता राखण्याचे आव्हान आहे. (NCP leader Dilip Bankar may face political challange from opponent)

निफाड तालुक्याच्या राजकारणात पिंपळगाव बसवंत गावाचे राजकीय, व्यापारी व शेतीच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. सध्या हे राजकीय केंद्र असुन येथे तीन प्रमुख पॅनेल रिंगणात उतरले आहे. सर्वांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यात शिवसेनेचे भास्करराव बनकर, भाजप प्रणीत मोरे आणि सत्ताधारी आमदार दिलीप बनकर आहेत. गावाच्या या निवडणुकीत प्रचार अगदी जोरात आहे. त्यामुळे दिलीप बनकर सत्ता राखतील का याचीच चर्चा आहे.

विरोधकांची २५ वर्षाची अपयशी कारकीर्द पिंपळगावकर अद्याप विसरलेले नाही. पण, आमच्या हाती सत्ता आल्यानंतर गत पाच वर्षात सरपंच व सदस्यांनी स्वत:ला झोकून देऊन काम केले. घनकचरा प्रकल्प, रस्ते, उद्याने साकारून जनतेचा विकास सार्थ ठरविला. मी राज्य शासनाकडून ६८ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. चांगल्या कामाची दखल शासनाने घेत माझी वसुंधरा अभियानासह सात पुरस्काराने गौरव होऊन चार कोटी रुपयांचा निधी मिळाला. विकासाचा हा ओघ अखंड सुरू ठेवण्यासाठी पुन्हा संधी द्या, अशी साद आमदार दिलीप बनकर यांनी पिंपळगावकरांना घातली.

पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शहरविकास पॅनलची सभा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तानाजीराव बनकर तर प्रमुख पाहूणे म्हणून अशोक शाह, मविप्रचे उपाध्यक्ष विश्‍वासराव मोरे उपस्थित होते. आमदार बनकर म्हणाले, विरोधकांच्या सत्तेच्या हव्यामुळे नगरपरिषदेचा दर्जा लांबणीवर पडून ग्रामपंचायत निवडणूक लादली गेली. सत्ता द्या घराची शासकीय नोंद करून देतो अशा भूलथापा त्यांच्याकडून जनतेला दिल्या जात आहे. पण शासनाने हा निर्णय दोन वर्षापूर्वीच घेतला असून २०११ पर्यंतची घरे कायम होणार आहे. त्यांचे प्रस्ताव आम्ही तत्काळ पाठविणार आहोत. पाच वर्षातील सत्तेच्या काळात घनकचरा प्रकल्प, जलजीवन योजना अशी कामे केली. कोरोनात समर्पित भावनेने जनतेची सेवा केली.

तानाजीराव बनकर म्हणाले, पोपटाकडे नशीब पाहणाऱ्या विरोधकांना या निवडणुकीत कायमचे घरी बसविले जाईल. आमदार बनकर व गणेश बनकर यांनी अवघ्या पाच वर्षात विकासकामांचा इतिहास रचला. आमदार बनकर या व्यक्तिमत्त्वाची किंमत पिंपळगावकरांनी ओळखावी. औद्योगीक वसाहतीतील दुसऱ्यांचे भूखंड विकणाऱ्यांची बस आता कायमची थांबवा. अशोक शाह म्हणाले, आमदार बनकर यांच्या विकासाच्या व्हिजनकडे बघून मतदार शहरविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देतील.

कचरा डेपोचा प्रश्‍न मार्गी

विकास झाला नाही म्हणणाऱ्या स्वयंघोषित विकास पुरूषांकडून सुरू असलेल्या भुलथापानां जनता भुलणार नाही. प्रलंबित मनाडीच्या पुराचा प्रश्‍न कायमचा सोडविला. घनकचरा प्रकल्प, उद्याने व रस्ते अशी डोळ्याला दिसणारी विकासकामे उभारली. त्यामुळे सात पुरस्काराने ग्रामपंचायत सन्मानित झाली. विरोधकांचा गोरगरीब जनतेला खोट्या आश्‍वासनाचा भडिमार सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT