Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आगामी निवडणुका महाविकास आघाडी करूनच लढणार

Sampat Devgire

नाशिक : आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी करूनच लढविल्या जातील. कोणत्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जवळ करणार नाही असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा मंत्री तछगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचायत निवडणूकांच्या पूर्व तयारीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक श्री भुजबळ आणि विधानसभेचे प्रभारी सभापती नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी ते बोलत होते.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागून जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे, असे आवाहन श्री भुजबळ यांनी केले, ते म्हणाले, आघाडी करून निवडणूक लढविण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात येणार असले तरी देखील महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकहिताचे कार्यक्रम राबवावेत असे आवाहन देखील पालकमंत्री भुजबळ यांनी केले. ते म्हणाले, आगामी निवडणुकीत आपण सर्व ताकदीने निवडणुकीत उतरणार आहोत. शरद पवार यांच्या विचारानुसार महिला आणि युवकांना जास्तीत जास्त संधी देण्यात येईल. निवडणुकीची सुरुवात ही मतदार पडताळणी पासून सुरु होत असते. कारण बोगस मतदान करण्यासाठी काही पक्षांकडून मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट केले जातात याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. मतदार यादीत किती खरे आणि किती खोटे मतदार आहेत याची पडताळणी करून मतदार नोंदणी करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक असल्यास तक्रारी दाखल करण्यात याव्यात असे आवाहनही यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते पुढे म्हणाले की, ग्राम पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यात येऊन आगामी ग्रामपंचायत, सोसायटी, बाजार समित्या, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पक्षाची ताकद वाढवावी. निवडणुकीला सामोरे जात असतांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक राजकीय स्थितीचा आढावा सादर केला. आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, माजी आमदार जयंत जाधव, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, मुंबई बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, युवती जिल्हाध्यक्ष किशोरी खैरनार, उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT