J. P. Gavit
J. P. Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Election News: जे. पी. गावित यांना खिंडीत गाठण्याचा डाव फसला?

Sampat Devgire

नाशिक : सुरगाणा (Nashik) तालुक्यातील काही गावे विकासासाठी गुजरातला (Gujarat) जाऊ इच्छित आहेत, असे वातावरण निर्माण करून कळवण सुरगाणा (Surgana) विधानसभा मतदार संघातील आपल्या विरोधकांना धोबीपछाड देण्यासाठी खेळलेला डाव आमदार नितीन पवार (Nitin Pawar) व त्यांच्या समर्थकांच्या (NCP) अंगलट आला आहे. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी थेट मुद्द्याला हात घातल्याने आंदोलकांवर माघार घेण्याची नामुष्की आली. (NCP leader Gavit in trouble on Gujarat merger issue)

कळवण -सुरगाणा विधानसभा मतदारसंघात माकपचे माजी आमदार जे. पी. गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार नितीन पवार यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. कट -शहाच्या राजकारणात जे. पी. गावित यांनी कळवण तालुक्यातील आमदार पवार यांच्या विरोधकांची एकजूट केली आहे. होमपीचवरच विरोधकांची झालेली एकजुटीमुळे पवार यांच्या सावध झाले आहेत.

त्यामुळे आमदार पवार यांच्या चाणक्य यांनी कळवणमधील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी जे. पी. गावित यांचा गड असलेल्या सुरगाणा तालुक्यात संभ्रम निर्माण करण्याचा डाव रचला. सांगली तालुक्यातील जत येथील शेतकऱ्यांनी कर्नाटकमध्ये जाण्याची वेळ साधत जणू काही सुरगाणा तालुक्यातील गुजरातलगतची गावे गुजरातमध्ये जाण्याचा इच्छुक असल्याचा आभास तयार केला. त्यासाठी आमदार पवार यांनी जे. पी. गावित यांच्या एकेकाळचे समर्थक तथा आजचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांना हाताशी धरण्यात आले.

चिंतामण गावित यांची ढाल करत गुजरात राज्यात समावेश मागणीचा घाट घातला. त्यासाठी ५५ गावांना एकत्र करत, तालुका सीमा संघर्ष समिती करत त्यांची बैठक घेतली गेली. बैठकीस आमदार पवार आवर्जून उपस्थित राहिले. केवळ उपस्थितच नव्हे तर, थेट गावेच नाही तर, तालुका विकासापासून वंचित असल्याची कबुली त्यांनी देत अप्रत्यक्ष, जे. पी. गावित यांना शह देण्याचा प्रयत्न केला. यातच गुजरात राज्यातील वासदा येथे जाऊन तहसीलदारांना निवेदन देत गुजरात राज्यात आमची गावे जोडा, अशी मागणी केली. त्यामुळे हा विषय राज्यभरात गेला.

पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने दखल घेत, या समितीला बैठकीसाठी पाचारण केले. यावेळी झालेल्या चर्चेत पालकमंत्री भुसे यांनी गावे गुजरात राज्याला का जोडावी यासाठी ठोस कारण मागविले. त्यावेळी चिंतामण गावित यांनी गावांना मूलभूत सुविधा नसल्याचा पाढा वाचला. मात्र, कोणतेही ठोस मुद्दा देऊ शकले नाही. गावांना मूलभूत सुविधा नाही हे ठोस कारण होऊ शकत नाही. कारण संपूर्ण तालुकाचं विकासापासून कोसो दूर आहे. तालुक्यातचं रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. हे केवळ सुरगाणा तालुक्यातच नाही तर, राज्यातील अनेक आदिवासी तालुक्यातही हीच परिस्थिती आहे.

अनेक ठिकाणी तर, याहूनही गंभीर परिस्थिती आहे. म्हणून या गावांना दुसऱ्या राज्यात जाण्याची भूमिका घेतलेली नाही. गावांचा विकास होत नसल्याचे सांगत, विशेष पॅकेज पदरात पाडून घेण्याचा छुपा अजेंडाही यामागे होता. त्यासाठी सरपंच यांना निधीचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र, पालकमंत्री भुसे यांनी या प्रश्न गावांचा नसून तालुक्याचा आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आपल्याला निधी मिळणार नसल्याची बाब सरपंच यांच्या लक्षात आली आणि त्यांनी युटर्न घेत आम्हाला गुजरात राज्यात जायचे नसल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे गुजरात राज्याला जोडा मागणी करणारे तोंडघशी पडले.

पालकमंत्री भुसे यांनी राष्ट्रवादीचे लेटरहेड दाखवत या मागे राष्ट्रवादी कनेक्शन असल्याचे उघड केले. त्यामुळे या आंदोलनाची हवाच निघून गेल्याने गावित एकाकी पडले अन, जे. पी. गावित यांना अडचणीत आणण्याचा डाव फसला अशी चर्चा आता, सुरगाणा तालुक्यात सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT