Anil Gote

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

धुळ्याचे नेते दिसले तरी `राष्ट्रवादी`च्या मंत्र्यांच्या अंगावर काटा का येतो!

Sampat Devgire

धुळे : राज्याचील सत्ताधारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) तोरा आहे. मात्र, हा प्रबळ पक्ष धुळे (Dhule) जिल्ह्यात स्थिरस्थावर होऊ शकलेला नाही. स्थानिक गटबाजीने पक्षाला पोखरले आहे. नेत्यांमध्ये एकमेकांविषयी तक्रारी (Dhule politics) व गटतट करण्यातच नेते गुंतले आहेत. त्यामुळे धुळ्याचे नाव जरी काढले तरी पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी, नेत्यांच्या अंगावर काटा येतो, अशी खंत कार्यकर्ते बोलून दाखवितात.

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होण्यास सुरवात झाली. या पक्षाचे स्थानिक सर्वेसर्वा व एकमुखी नेतृत्व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना विरोधी भाजपने पळवून नेले. तसेच या पक्षाच्या काही प्रबळ नगरसेवकांनाही भाजपच्या तंबूत दाखल करून घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा शक्तीपात झाला. असे असले तरी धुळे शहर, काही प्रमाणात धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बऱ्यापैकी अस्तित्व राहिले. शिरपूर तालुक्यात मात्र राष्ट्रवादीला घट्ट पाय रोवता आले नाहीत.

श्री. कदमबांडे यांच्यामुळे धुळे शहर पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. आमदारकी, अन्यथा महापालिका ताब्यात ठेवण्याचे कसब त्यांनी साधले. नंतर माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी दोंडाईचा पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता राखली होती. साक्री पालिकेत नाना नागरे यांच्यामुळे या पक्षाचा काही काळ झेंडा होता. कालांतराने श्री. कदमबांडे, श्री. देशमुख, श्री. नागरे अन्य पक्षात गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती खिळखिळी झाली. ऐन विधानसभा निवडणुकीत पक्षाला घरघर लागली.

जिल्ह्यात नेतृत्व नसलेला पक्ष, अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. वाटचालीत कायम राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठविणारे श्री. गोटे या पक्षाशी कसे जमवून घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले. पक्षाने त्यांना प्रदेश उपाध्यक्ष आणि धुळे- नंदुरबारचे प्रभारी, अशी महत्त्वाची पद दिले.

नवे- जुने वादाचा प्रश्‍न

भाजपचा बालेकिल्ला झालेल्या खानदेशात माजी मंत्री गिरीश महाजन, डॉ. सुभाष भामरे, जयकुमार रावल, अमरिशभाई पटेल, राजवर्धन कदमबांडे यांना या पक्षात स्थिरस्थावर होऊ न देणे, भाजपचे वातावरण आरोप, टीकाटिप्पणीतून खराब करण्यासाठी श्री. गोटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी लपून राहिली नव्हती. श्री. गोटे यांनी भाजपच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांवर संधी मिळेल तेव्हा आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या आहेत. श्री. कदमबांडे सोडून गेल्यामुळे निर्माण झालेली पक्षातील पोकळी श्री. गोटे भरून काढतील, अशी अटकळ वरिष्ठ नेत्यांना होती. मात्र, राष्ट्रवादीत येथे नवे आणि जुने या वादाने डोकेवर काढले.

गटातट अन्‌ तक्रारींचा सपाटा

श्री. गोटे यांनी त्यांच्या मर्जीतील शहर व जिल्हा कार्यकारिणी स्थापण्याचा आग्रह धरला. त्यांनी नवे व त्यांच्या स्व-स्थापनेतील लोकसंग्राम संघटनेतील विश्‍वासू चेहरे राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीवर आणण्याचा प्रयत्न चालविला. मात्र, जुन्या पदाधिकाऱ्यांनी श्री. गोटे यांना हे गणित काही अजून शंभर टक्के जमू दिले नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीत गोटे आणि शिंदे- पाटील, बेडसे, भोसले गटाचा बोलबाला आहे. यातून मग एकमेकांना पदावरून काढा, त्याविषयी तक्रारींचा सपाटा, तक्रारींची घसरत जाणारी पातळी, तक्रारींसाठी शिष्टमंडळ घेऊन जाणे असले प्रकार वाढले. त्यामुळे धुळ्याचे कुणी आले तरी मुंबईतील पदाधिकारी, नेते, मंत्र्यांच्या अंगावर काटा येतो, असे कार्यकर्ते सांगतात.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT