Nashik Police Detains Suspect in NEET Leak Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NEET पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन, राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरुन एका तरुणाला नाशिक पोलिसांकडून अटक

NEET exam cancelled : NEET पेपर फुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचे पथक नाशिकमध्ये येणार आहे.

Ganesh Sonawane

NEET exam cancelled Nashik Crime : देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे केंद्र सरकारने यंदाच्या वर्षी 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट( NEET 2026) परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

3 मे रोजी देशभरातील तब्बल 22 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. आता, ही परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जाणार आहे. त्यामुळे जवळपास २२ लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. दरम्यान या पेपरफुटीचे नाशिक कनेक्शन पुढे आले असून नाशिक पोलिसांनी एका ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

नाशिक पोलिस उपआयुक्त किरण चव्हाण यांनी यासंदर्भात पत्रकारपरिषद घेऊन माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका संशयीत आरोपीला ताब्यात घेण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. त्याप्रमाणे त्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरुन एका तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे. हा आरोपी नीट प्रकरणातील असल्याची माहिती मिळाली आहे.

या संशयिताला नाशिक पोलिसांच्या युनिट २ च्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याला ताब्यात घेण्यासाठी थेट केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक नाशिकमध्ये येणार आहे. ते आल्यानंतर आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या या प्रकरणाविषयी फार माहिती नाही. पंरतु राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेतल्याचे नाशिक पोलिसांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

तसेच, आरोपीने त्याचा वेष बदलला, त्याने स्वतःचे केप कापलेले असल्यामुळे सुरुवातीला त्याची माहिती मिळत नव्हती. मात्र तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी तपास करत त्याला ताब्यात घेतले आहे, असे नाशिक पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलेला आरोपी BAMS चे शिक्षण घेत असल्याचे कळत आहे. तसेच त्याची मेडिकल काउन्सलिंग एजन्सी असल्याचीही माहिती मिळत आहे. यातील पेपर हे नाशिकमधूनच प्रिंट करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिकमधून बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका पुढे हरियाणा आणि त्यानंतर पुढे बिहार, आंध्र प्रदेश तसेच जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे यामागे मोठी साखळी कार्यरत असल्याचं दिसत असून यात मोठ्या स्वरुपात आर्थिक देवाण-घेवाण झाली असावी. दरम्यान, याचा शोध आता केंद्रीय तपास यंत्रणा घेत आहेत. (Nashik Crime)

तपास सीबीआयकडे...

केंद्र सरकारने संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची जबाबदारी आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) तपास यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, सर्व नोंदी, कागदपत्रे आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाईल, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT