Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : 'भ्रष्टाचाराचे मडके', खासदार लंकेंचे उपोषण; 'LCB'च्या कारभाराचे धिंडवडे

Pradeep Pendhare

Ahmednagar News : खासदार नीलेश लंके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासनाविरोधात गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेत. दूध भाव वाढीसाठी केलेल्या आंदोलनातून जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले असतानाच, आता भ्रष्टाचाराच्या कारभारावरून जिल्हा पोलिस दलाविरोधात आक्रमक झाले आहेत.

नगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरवात केली.

जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा कारभार खासदार नीलेश लंके यांच्या रडारवर आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला खासदार लंके यांच्या आंदोलनाचा कसा सामना करतात, याकडे आता लक्ष आहे. गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांच्या भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) उपोषण करताना खासदार लंके यांनी 'भ्रष्टाचाराचे मडके', असा मजकूर लिहिलेला माठ आंदोलनस्थळी समोरच ठेवला. या माठ लक्षवेधी ठरला होता अन् पोलिसांच्या कारभाराचे धिंडवडे काढत होता. महाविकास आघाडीतील नेत्यांनी जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर यावेळी चांगलेच तोंडसुख घेतले.

पोलिस (Police) प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा खासदार लंके यांनी दिला होता. तशी तयारी सुरू असल्याचे समाज माध्यमावर काही मजकूर व्हायरल होत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाद्वारे सुरू असलेली हप्तेखोरी बंद होऊन तेथील नियुक्त अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या तातडीने बदल्या करण्याची खासदार लंके यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, या मागणीची दखल घेतली नसल्याचा दावा त्यांनी केलाय. त्याच्या निषेधार्थ खासदार लंके आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले.

आंदोलन दुपारी एक वाजल्यापासून सुरू झाले. 'भ्रष्टाचाराचे मडके', असे लिहिलेला माठ बाळासाहेब बोराटे यांनी डोक्यावर घेऊन सर्व जण आंदोलन स्थळी आले. तेथे त्यांनी आणि अशोक बाबर यांनी समोरच हा माठ ठेवला. या आंदोलनात अभिषेक कळमकर, किरण काळे, योगीराज गाडे, दत्ता जाधव, विक्रम राठोड, अमोल येवले, आसाराम कावरे, प्रकाश पोटे सहभागी झाले होते.

नीलेश लंकेंचा इशारा

"आज आम्ही प्रातिनिधिक मडकी फोडतोय, भ्रष्टाचाराचा पापाचा मडका आता भरलेला आहे, आजपासून ते फोडायला आम्ही सुरवात करतोय, पोलिसांच्या या हप्त्यांचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागतो. कोणतेही काम पैशाशिवाय होत नाही, याला वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही", असा इशारा यावेळी खासदार नीलेश लंके यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT