Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe : वाकडं ते वाकडंच, आता राहाता इथं जाऊनच बसतो; खासदार लंकेंचे विखे पिता-पुत्रांना आव्हान

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : शरद पवार साहेबांना सांगितलं आहे की, राहात्याचा निर्णय लवकर घ्या आणि माझ्यावर जबाबदारी देऊन टाका. मी करतो काय करायचे ते! यांना साखरेत मळले, घोळले, तरी वाकडं ते वाकडंच!

आमच्या शेपटावर पाय दिला, तर मलाही नीलेश लंके म्हणतात, असे सांगून आता मी राहाता मध्येच जाऊन बसतो, असे म्हणत खासदार नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना थेट आव्हानच दिले.

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण इथं मेळाव्यात खासदार नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. खासदार लंके यांनी विखेंनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर भाष्य केले. हे भाष्य करताना नीलेश लंके यांनी विखेंचे सर्वच काढले.

खासदार लंके म्हणाले, "निवडणूक आयोगाकडे अर्ज करून ईव्हीएम (EVM) शीनची पडताळणीसाठी 18 लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. तज्ञांच्या मते मशीनमध्ये काहीही फेरफार होणार नाही. असे झाले, तर संपूर्ण देशातील निवडणुकीवर संशय घेतला जाईल. काल परवा उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे".

अहो, तुमचे वडील असतील,आजोबा असतील इथं नीलेश लंके आहे. म्हणूनच तुमची जिरवली. माझ्याकडे कारखाना नाही, शिक्षण संस्था नाही, बुध्दी आहे म्हणून तर जिरवली ना? खरे तर आपण हरकत घ्यायला हवी होती.

चोराच्या उलटया बोंबा यालाच म्हणतात. लोकांनी जिरवली, तर आता आमच्या चुका झाल्या, आम्ही कमी पडलो, आता आपण सुधारून वागले पाहिजे. पण एखाद्याचं शेपट वाकडं ते वाकडंच असतं, असे म्हणत खासदार लंके यांनी विखे पिता-पुत्रावर जोरदार टिका केली.

अनेक जण सांगतात, लोकसभेची निवडणूक (Lok Sabha) जिंकणे अशक्य गोष्ट. मात्र आपण अशक्य ते शक्य करून दाखविले. हे शक्य मी नव्हे, तर तुम्ही करून दाखविले आहे. मी एक माध्यम आहे. मी सगळया ठिकाणी पोचू शकत नाही. संपूर्ण लोकसभा निवडणुकीत मी फक्त दोन दिवस तालुक्यात आलो.

त्या तुलनेत विरोधी उमेदवाराच्या आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या 50 च्यावर चकरा झाल्याचे सांगत खासदार लंके यांनी विखे पिता-पुत्रांना चिमटा काढला. खासदार होऊन दिल्लीत गेल्यानंतर सुरळीत हाईल, की नाही शंका होती.

चार-दोन दिवस थांबलो आणि सर्व काही जुळवून आलो आहे. मुंबईप्रमाणेच दिल्लीचेही कामकाज असल्याने काही अडचण येणार नसल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.

स्टेट्स बदलणारे लक्षात आले!

महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होईपर्यंत 365 दिवस आपल्या सोबत असलेले महायुतीचे सरकार आल्यानंतर विरोधकांच्या कळपात गेले. मी खासदार झाल्यानंतर पुन्हा आमच्याकडे येऊ पाहत आहे. खरं तर मी परमेश्‍वराला धन्यवाद देतो की, मतमोजणीच्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत आपण मागे होते ते चांगले झाले.

12 वाजेपर्यंत विरोधकांचे स्टेटस ठेवलेले आपण मतमोजणीत पुढे गेल्यानंतर आपले स्टेटस ठेवणारे लक्षात आले. आपल्या कार्यालयात अशा लोकांच्या स्टेटसचे स्क्रिन शॉटही पहावयास मिळतील, असेही खासदार लंके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT