Nitesh Rane On Land Jihad : sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nitesh Rane On Land Jihad : नाशिकमध्ये 'लँड जिहाद' अन् भद्रकालीत ड्रग्ज... ; नितेश राणेंनी दिला अल्टिमेटम!

Chetan Zadpe

Nashik Politics : सातत्याने वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणाऱ्या भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आता नाशिकमध्ये 'लँड जिहाद' सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. एवढेच नाही तर खासदार राऊत सकाळी दारू पिऊन बोलतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काय महत्त्व द्यायचे, अशी शेलक्या शब्दात त्यांनी राऊतांवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

'भाजपवाले चिलीम ओढून मग बोलतात', अशी टीका अलीकडेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्याचा राणे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, 'खासदार राऊत सकाळी दारू पिऊन बोलतात, नाशिकमध्ये ते आले की बोलण्यापूर्वी दारु पिऊन बोलतात, हवं तर वाहतूक पोलिसांकडे असलेले ड्रिंकिंग मशिन लावून पाहा, ते पळून जातील,' असा दावाही त्यांनी केला. (Latest Marathi News)

आमदार राणे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लँड जिहाद, ड्रग्ज, अनधिकृत भोंगे या विषयावरच चर्चा केली. त्याबाबत आमदार राणे यांनी थेट नाशिक महापालिकेचे आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना अल्टिमेटमच दिले. ते म्हणाले, नाशिक शहरात असे गैरप्रकार सुरू आहेत. मात्र प्रशासन त्याबाबत काहीच करीत नाही. त्यामुळे या यंत्रणेला धाक दाखवावा लागेल. ते काम कसे करतात, हे मला चांगले ठाऊक आहे.

नाशिक शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. भोंग्यासाठी न्यायालयाचा आदेश आहे. ते केव्हा वाजले पाहिजेत, कधी वाजले पाहिजेत, याची डेडलाईन आहे. याविषयीची काही नियमावली आहे, त्याचे पालन ठराविक लोकच करतात, अन्य लोक का करत नाही, असा प्रश्न राणे यांनी केला.

ते म्हणाले, सर्व कायदे हिंदू धर्मानेच पाळले पाहिजे का, इतर धर्मांनी का नाही, या भोंग्यांवर कारवाई करणार नसाल तर येणाऱ्या काळात जनआंदोलन उभे करावे लागेल. सरकार आपलं आहे. अतिक्रमणांच्या नावाने लँड जिहाद सुरू आहे. रात्री दीड-दोनला केवळ अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल, तर यात विशेष लक्ष घालावे लागेल.

नाशिकचे पोलिस आयुक्त आणि महापालिकेचे आयुक्त या दोघांनाही ‘अल्टिमेटम’ दिला. ते म्हणाले, की पोलिस खाते आमचे आहे. मात्र, पोलिस विभागात काही सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या भाषेत बोलायला गेले तर सडके द्राक्ष आहेत. त्यांना आम्हाला बाजूला करण्याचे काम गृहमंत्रिसाहेबांच्या माध्यमातून करावे लागेल. त्रासदायक अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणारच, असा दावा त्यांनी केला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT