NMRDA Action News: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आपातकालीन व्यवस्था सुरू आहे. त्यासाठी ‘एनएमआरडीए’ विभागाने त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या घरे व इमारतींवर बुलडोझर चालवला. ही परिस्थिती कधी निवळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीचे नियोजन आणि आपत्कालीन व्यवस्था अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांनी तसे नियोजन केले. त्यामुळे कोणताही मोबदला न देता नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शंभर मीटर पर्यंतची घरे व बांधकामे पाडण्यात आली.
हा प्रश्न सध्या गंभीर बनला असून कैलास खांडबहाले या शेतकऱ्याने साखळी उपोषण सुरू केले आहे. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. राज्य सरकार विरोधात आंदोलन सुरू असलेले आंदोलन रोज अधिक तीव्र होत आहे. त्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या दौऱ्याची प्रतिक्षा आहे.
या संदर्भात आता मनसेचे नेते दिनकर पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार हिरामण खोसकर आणि पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. ३०) बैठक होणार आहे. यावेळी ‘एनएमआरडीए’ विरोधात आक्रमक भूमिका घेतली जाण्याची चिन्हे आहेत.
गेल्या आठवड्यात आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, अॅड प्रभाकर खराटे आदींसह विविध नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईला तत्पूर्ती स्थगिती देण्याचे मान्य केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
मुख्यमंत्र्यांनी सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. ‘एनएमआरडीए’ ची कारवाई सुरू राहील की बंद होईल, याचा निर्णय त्या अहवालानंतर ठरणार आहे.
अद्यापही शेतकऱ्यांवर हक्काच्या जमिनीतून बेघर होण्याची स्थिती कायम आहे. वडिलोपार्जित जमिनीत बांधलेली घरे आणि इमारती पाडण्यात आले आहेत. पुढे काय होणार यासाठी सगळ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यासाठी संकट मोचक मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वरचा दौरा केव्हा करणार याची उत्सुकता वाढली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यानंतर पाच दिवस झाले आहेत. अद्यापही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा दौरा केव्हा होणार याची कोणतीही सूचना प्रशासनाकडे नाही. शेतकरी रोज याबाबत विचारणा करीत आहेत.
त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या घरातून बेघर होण्याचे संकट आले आहे. राज्य शासनाच्या कारवाईने हे घडले आहे. आता त्यातून दिलासा केव्हा मिळणार याची भीतीयुक्त उत्सुकता आहे. त्यामुळेच त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांचे डोळे कुंभमेळा मंत्री महाजन यांच्या दौऱ्याकडे लागले आहेत.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.