<div class="paragraphs"><p>NCP women leaders with Education Officer.</p></div>

NCP women leaders with Education Officer.

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा इशारा, `आप`च्या भावेंना काळे फासू!

Sampat Devgire

नासिक : महानगरपालिकेतील (NMC) शिक्षणाधिकारी श्रीमती सुनिता धनगर यांच्याबद्दल आम आदमी पार्टीचे (AAP) प्रवक्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांनी अपशब्द वापरल्याने श्री. भावे यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आज श्री. भावे यांना काळे फासू असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी दिला आहे.

यासंदर्भात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी धनगर यांची भेट घेतली. यावेळी `आप`च्या भावे यांनी महिलांशी बोलतांना तोंड सांभाळून बोलावे अन्यथा भावे यांचेच तोंड काळे करावे लागेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

सार्वजनिक जीवनात काम करीत असतांना राजकीय कार्यकर्त्यांनी काही बंधने स्वतःहून पाळायची असतात मात्र त्याला जितेंद्र भावेंसारखे कार्यकर्ते खो घालतात. कोरोना काळात काही महिन्यांपूर्वी आपच्या भावेंनी खाजगी रूग्णालयात जादा बिल आकारणीतून अर्धनग्न आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे आपची बदनामी तर झालीच उलट पोलिस स्टेशन मध्ये भावेंवर गुन्हा नोंदला गेला. येणाऱ्या काळात महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भावे हे प्रसिध्दीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करतात. सोबत सहकाऱ्यांकडून मोबाईल वर चित्रीकरण करून घेतात नंतर तोच व्हिडीओ मोबाईल वर अपलोड करून प्रसिध्दी मिळवतात. वास्तविक पाहता परवानगी न घेता चित्रीकरण करणे गुन्हा आहे.

महापालिकेतील शिक्षणाधिकारी धनगर यांच्याबद्दल भावे यांनी त्यांच्याच कार्यालयात जाऊन अतिशय हीन दर्जाची भाषा वापरली आहे. अरे तुरे एकेरी शब्दाचा वापर करीत हे लोक माजले आहेत, हरामाचा पगार घेतात, हे आपले नोकर आहेत, यांना जनतेला भेटायला वेळ नाही इथपासून तुमचे वस्त्रहरण करेन इथपर्यंत त्यांची जीभ घसरली आहे. एका महिला अधिकार्याशी या पध्दतीची भाषा आपच्या पदाधिकारीं कडून अपेक्षित नाही.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराच्या वतीने आम्ही मागणी करतो यापुढील काळात आपचे जितेंद्र भावे यांना नासिक महानगरपालिकेत कायमस्वरूपी प्रवेशास बंदी घालावी. तसेच शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्या मनपा कार्यालयात जाऊन वस्त्रहरण करण्यापर्यंत भाषा वापरल्याने त्याच्याविरोधात पोलिसांनी शासकीय कामकाजात अडथळा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा. एका प्रशासनातील महिला अधिकाऱ्याच्या अवमान प्रकरणी मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी स्वत: पुढाकार घ्यावा व पोलिस आयुक्त दिपक पांडे यांनी त्यावर कडक कारवाई करावी अन्यथा महिलेच्या संदर्भात वस्त्रहरण भाषा वापरण्याचे दुष्परिणाम भावेंना भोगावे लागतील, असा इशारा दिला. यावेळी पश्चिम विभाग अध्यक्ष योगिता आहेर, शहर महिला पदाधिकारी स्मिता चौधरी, मेघा पगारे, सिम्मी राणा, संगिता सानप उपस्थित होत्या.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT