Aaditya Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aaditya Thackeray News : 'आमचे सरकार पुन्हा येईल आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करेल'; आदित्य ठाकरेंचा दावा...

संपत देवगिरे : सरकारनामा

Aaditya Thackeray : आज धर्म आणि जातीमध्ये एवढा वादविवाद सुरू आहे की, चिंता वाटते. मात्र सर्व धर्म, जाती आणि घटक एकत्र येतील असं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे शाळा. म्हणून प्रत्येकाने द्वेष संपवायचा असेल तर शाळा सुरू करावी, असा सल्ला उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आदित्य ठाकरे यांनी दिला. तर 'आमचे सरकार पुन्हा येईल आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करेल,' असा दावा त्यांनी केला. Aaditya Thackeray News

नाशिक रोड येथील जिजामाता महिला शिक्षण प्रसारक मंडळ आणि समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन शाळेच्या इमारतीचे उद्घाटन आणि शिवसेनेच्या दिवंगत नेत्या सत्यभामा गाडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी सत्यभामा गाडेकर यांच्या संस्थेच्या इमारतीचे कौतुक करीत त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे स्वागत केले.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, आज एका महिलेचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. याहून मोठे कोणतेही काम असू शकत नाही, कारण त्यांनी शाळा उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण असा संदेश दिला होता. यातील 20 टक्के राजकारणातदेखील समाजकारण कसे पेरता येईल, हा आपला प्रयत्न असला पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)

शिवसेनेने आजवर फक्त आणि फक्त समाजाच्या हितासाठीच काम केले आहे. त्यामुळे आज शिवसेनेला जनतेत एवढे महत्त्वाचे स्थान प्राप्त होऊ शकले. शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, तसेच दादाभाई नौरोजी यांनी शिक्षणासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी महिलांना शिक्षणाची दारे उघडी नव्हती.

समाजातसुद्धा शिक्षणाचा प्रसार नव्हता. अशावेळी या समाजसुधारकांनी किती मोठा दृष्टिकोन ठेवला असेल याची कल्पना करा. आपल्याला त्यांचे हे काम पुढे नेतानाच त्यात आधुनिकता आणली पाहिजे. शाळांमध्ये मैदानी खेळांना प्राधान्य दिले पाहिजे. मैदाने असली पाहिजेत. यापेक्षा मोठे कोणतेही काम असू शकत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.

ते म्हणाले, मुंबईत महापालिकेच्या शाळांचा प्रश्न मी सर्वप्रथम हाती घेतला. शिक्षणात विविध सुधारणा केल्या. व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले. राज्यात आपले सरकार आल्यावरदेखील हा प्रयोग मी हाती घेतला होता. मात्र, कोरोना आल्यावर त्यात व्यत्यय आला आणि आपले सरकार गेले. मात्र, आपले सरकार पुन्हा येणार आहे. आपले सरकार आल्यावर आपण शिक्षणाच्या आधुनिकीकरण आणि व्हर्च्युअल क्लासरूमसाठी पुन्हा काम सुरू करू.

यावेळी शिवसेनेचे माजी आमदार वसंत गीते, माजी आमदार योगेश घोलप, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, दत्ता गायकवाड, संचालक योगेश गाडेकर, संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी गाडेकर, मनीषा गाडेकर, नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Amol Sutar)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT