Sadabhau Khot & Gopichand Padalkar
Sadabhau Khot & Gopichand Padalkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पडळकर, खोत म्हणजे भाजप नियुक्त चंगु आणि मंगू

Sampat Devgire

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) दिवसभर टिका करण्यासाठी भाजपने (BJP) पार्टी विथ डिफरन्स या नावाखाली गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) ही `चंगु-मंगू` ची जोडी नियुक्त केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या, भाजपची राज्यात सत्ता नसल्याने नेते सैरभैर झाले आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करण्यासाठी कोणीतरी अक्कल शून्य माणसाची गरज ओळखून भाजपने पार्टी विथ डिफरन्स या नावाखाली गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली.

या दोन्ही नेत्यांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच दिसतात. या दोन्ही नेत्यांचा दिवसच त्यांच्यावर टीका करत सुरू होतो. वास्तविक पाहता विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे तेथे आपापल्या क्षेत्रातील विद्यमान लोकांना नियुक्त करण्याची प्रथा आहे. परंतू भाजपकडे कोणत्या प्रकारची लोकं आहेत, त्यांची क्षमता काय व काम काय हे त्यांच्या नियुक्तीवरून दिसते. अधिक विद्वान लोकप्रतिनिधी नसल्याने या जागा भरण्यात अकलेत कमी असणाऱ्यांची गरज बघून यांची नियुक्ती करण्यात आली की काय अशी शंका येते.

भाजपचे सर्वेसर्वा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील शरद पवार यांच्यावर बोलताना विचारपूर्वक बोलतात. परंतू महाराष्ट्रातील हे दोन अक्कल शून्य चंगुमंगू सातत्याने पवार कुटुंबियांवर अत्यंत खालच्या थरावर तर्कहीन टीका करतात. अर्थात ज्याची जैसी कुवत तसेत ज्ञान तो पाजळत असतो. नुकतेच सोलापुर येथे सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचे आडनाव बदलून 'आगलावे' करावे असे म्हटले.

मला असे सांगावेसे वाटते की, सदाभाऊ आपण काय बोलतो याचा विचार करीत चला. तुम्ही कोण?. तुमचे योगदान काय?. तुम्ही राज्यमंत्री कसे झालात?. भाजपने तुमची कोणती पात्रता पाहून तुम्हाला पद दिले? हे महाराष्ट्राला माहित आहे. ज्या राजू शेट्टी यांच्यामुळे तुम्हाला पद मिळाले, त्यांच्याशी तुम्ही प्रामाणीक राहिली नाहीत. इतरांवर काय बोलता, स्वतःविषयी विचार करा. शरद पवार आगलावे नक्कीच नाहीत, मात्र त्यांनी ठरवले तर तुमच्या सारख्या भस्मासुराला ते नक्कीच भस्म करू शकतील एव्हढे लक्षात ठेवा.

त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रात एक राजकीय संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला राजकीय प्रतिष्ठा, शिकवण व परस्परांचा कसा सन्मान करावा याचे उदाहरण घालून दिले आहे. शरद पवार त्या परंपरेतील नेते आहेत. पण तुमचा वारसा कोणता, तुम्ही कुठे होता, कुठे पोहोचलात याचे जरा आत्मचिंतन करा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जर चिडले तर तुम्हाला जशास तेस शाब्दीक उत्तर देतील.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT