NCP Sharad Pawar News: जळगाव जिल्ह्यातील सर्व सत्ता केंद्रांवर महायुतीचा कब्जा आहे. दुसरीकडे पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी रात्रभर नागरिकांचा मुक्कामाचे चित्र आहे. सत्ताधाऱ्यांविरोधातील हा आक्रोश आज व्यक्त होणार आहे.
डिझेलसाठी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांनी रांगा लावल्याचे चित्र आहे. डिझेल टंचाईमुळे खरीपाच्या हंगामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त असल्याचे जळगाव जिल्ह्यात चित्र आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी पेट्रोल पंपांवर रांगेत असलेले काळे बाजारवाले असल्याचा आरोप केला होता. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यावर आंदोलनाचा इशारा दिला होता.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह डिझेलच्या टंचाई आणि अन्य प्रश्नांसाठी शेतकरी आज जनअक्रोश मोर्चा काढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे या असंतोषाचे नेतृत्व करतील. आज चार वाजता जामनेर शहरातून मोर्चा निघेल.
जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी कामाला लागला आहे. त्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. डिझेल आणि रासायनिक खते उपलब्ध नसल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. या संदर्भात सत्ताधारी भाजपला जाब विचारला जाणार आहे.
गेले काही दिवस शेतकरी घरदार सोडून डिझेल साठी पेट्रोल पंपांवर रात्रभर मुक्काम करीत आहे. या शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करणे सरकारची जबाबदारी आहे. सत्तेत बसलेले नेते मात्र त्याकडे पाठ फिरवत आहेत. शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत, त्याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे, असे राष्ट्रवादीचे नेते खोडपे म्हणाले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करण्यात यावी. रासायनिक खते उपलब्ध करून त्यांची किंमत वाढ आणि काळाबाजार थांबवावा. पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांसाठी 50 टक्के साठा राखीव ठेवावा या प्रमुख मागण्यांसाठी आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस भाजप विरोधात शक्ती प्रदर्शन करणार आहे. त्यामुळे या मोर्चाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
चांदवड येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चानंतर खुद्द भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातच त्यांना आव्हान देण्याचा राजकीय प्रयत्न या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेलाही जाब विचारला जाणार असल्याने आज सायंकाळी चारला होणारा मोर्चा चर्चेचा विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.