Ahmednagar Politics and District Central Cooperative Bank
Ahmednagar Politics and District Central Cooperative Bank Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : नगरच्या राजकारणात 'पिसाळ पॅटर्न'ची चर्चा; काय आहे हा पॅटर्न?

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar District Central Cooperative Bank: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष उदय शेळके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती.

त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला आणि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी कर्डिलेंची वर्णी लागल्यामुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अजित पवारांना मोठा धक्का बसला.

कारण मंगळवारी (दि.7 मार्च) अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळांची बैठक घेत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा केली होती.

त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अध्यक्षपदासाठी अर्जही दाखल केला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होईल, अशी शक्यता होती. मात्र, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेवटच्या क्षणी बाजी पलटवली आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी अर्ज दाखल केला.

यानंतर झालेल्या निवडणुकीत कर्डिले विजयी झाले. तर चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला. त्यामुळे विखेंनी पवारांसह थोरांताना धक्का देत मोठी राजकीय खेळी केल्याने नगरच्या राजकारणात पिसाळ पॅटर्नची चर्चा चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पिसाळ पॅटर्न नेमकं काय आहे? याबाबत थोडक्यात माहिती पाहूयात..

काय आहे पिसाळ पॅटर्न?

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विखे गटाचे अंबादास पिसाळ आणि काँग्रेसचे बाळासाहेब साळुंके हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीसाठी उभे होते. यावेळी महाविकास आघाडीचे मतं फूटू नये यासाठी मतदारांना महाविकास आघाडीने बारामतीची सहल घडविली होती.

त्यानंतर त्यांना थेट मतदानाच्या दिवशी बसमधून मतदान केंद्रावर आणण्यात आलं. त्यामुळे आघाडीचे बाळासाहेब साळुंके हेच विजयी होतील, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना होता.

मात्र, मतमोजणी नंतर विखे गटाचे अंबादास पिसाळ हे एका मताने विजयी झाले. त्यामुळे हाच पॅटर्न पुन्हा एकदा जिल्हा सहकारी बँकेतील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पहायला मिळाला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT