Congress agitaion at Chalisgaon
Congress agitaion at Chalisgaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पंतप्रधानांनी काँग्रेसवर खोटी टीका करताना महाराष्ट्राचा अपमान केला!

Sampat Devgire

चाळीसगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी संसदेमध्ये ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय श्रमिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मदत करून देशात कोरोनाचा (Covid19) प्रसार केला’ असे वक्तव्य करून महाराष्ट्र व काँग्रेसची (Congress) बदनामी केली. त्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत कोरोना काळात काँग्रेसने गरीब मजुरांसाठी भोजन व प्रवासाची सोय केली. त्याबाबत त्यांना दोषी ठरवले होते. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची व काँग्रेस पक्षाची माफी मागावी, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे येथील भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनापूर्वी महाराष्ट्र काँग्रेस कमेटीच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष अशोक खलाणे यांच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून भाजपचे पंतप्रधान असल्याचे सांगत त्यांच्यावर जोरदार टीका केली. श्री. पवार यांनी सांगितले, की अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे नेते खासदार राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० ला लोकसभेत कोरोनाच्या संभाव्य धोक्याची कल्पना अगोदर दिलेली असताना त्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या विधानाची टिंगल उडविण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांचा भारतामध्ये कार्यक्रम आयोजित करून २४ व २५ फेब्रुवारी २०२० चा कार्यक्रम देण्यासाठी कोविडच्या संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करून ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम मोदी शासनाने घेतला. केवळ भारतीय जनता पार्टीचे राजकीय हित साध्य करण्यासाठी संपूर्ण देशातील जनतेला वेठीस धरण्यात आले.

केंद्र शासनाने अचानक लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या या मोठ्या शहरांमध्ये मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना उपासमारीला सामोरे जावे लागत होते. एकीकडे हाताला काम नाही आणि दुसरीकडे उदरनिर्वाहाचे साधन नाही. अशा परिस्थितीत आपल्या घरी जाण्यासाठी या मजुरांना वाहनांची सोय नसल्याने लाखोच्या संख्येने मजूर रस्त्यावर उतरले होते, हे सर्व देशाने पाहिले.

संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार माजल्यामुळे जनता हतबल झाल्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशातील प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून वाहनांची व्यवस्था करून मजूरांना सहकार्य करून त्यांच्या घरी स्थलांतरीत केले. एवढे चांगले काम काँग्रेसने केलेले असताना देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी कौतुक करण्यापेक्षा अशा प्रकारचा गंभीर आरोप करणे हे दुर्दैवी आहे असे सांगून पंतप्रधानांनी काँग्रेससह संबंध महाराष्ट्राची माफी मागावी, यासाठी आम्ही हे आंदोलन करीत असल्याचे प्रदीप पवार यांनी सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष अनिल निकम, अशोक खलाणे, जळगाव महानगराध्यक्ष श्‍याम तायडे, माजी आमदार ॲड. ईश्‍वर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिंपी, सचिन सोमवंशी (पाचोरा), नितीन सूर्यवंशी, रवींद्र जाधव, ॲड. वाडीलाल चव्हाण, प्रदीप देशमुख, राहुल मोरे, अल्ताफ खान, महिला अध्यक्षा अर्चना पोळ आदी उपस्थित होते.

जोरदार घोषणाबाजी

पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या संपर्क कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मागणीचे निवेदन त्यांच्या कार्यालयातील प्रतिनिधीला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत काँग्रेसच्या भावना पोहचवाव्यात, अशी मागणी करून त्यांचा निषेध करण्यात आला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT