Accident News sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Hit and Run case : तीन गंभीर जखमींपेक्षा पोलिसांना 'त्या' मद्यपी चालकाचीच जास्त काळजी?

Nashik Police : पोलिसांवर कोणाचा दबाव?, १२ दिवस होऊनही मद्यपी चालक अद्याप मोकाट का? सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त

Sampat Devgire

Nashik Accident and Police : पुण्याचे हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच तशीच पुनरावृत्ती नाशिकमध्येही झाली आहे. मद्यपी बांधकाम व्यावसायिकाने थेट घरातच वाहन घुसविले. मात्र अद्यापही तो बिनदिक्कत आणि मोकाट आहे.

शहरातील कामगार वसाहत असलेल्या शिवाजीनगर भागात चार जूनला मध्यरात्री मोठा अपघात झाला. यामध्ये अती मद्यपान केलेल्या आणि बिल्डरशी संबंधित चालकाची गाडी नियंत्रणा बाहेर गेली आणि ती थेट एका घरात घुसली.

यावेळी घरात गाढ झोपलेल्या सुरेश कृष्णा भदाणे (वय ६०), कलाबाई सुरेश भदाणे (५८) आणि बालक पृथ्वी सूरज भदाणे (६) हे तिघे गंभीर जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणूनच त्यांचे प्राण वाचले. यावेळी मद्यपान केलेल्या चालकाचे गाडीवर आणि स्वतःवर देखील नियंत्रण राहिलेले नव्हते.

ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मोठा आवाज झाल्याने नजीकचे नागरिक मध्यरात्री खडबडून जागे झाले. संतप्त नागरिकांनी मद्यपी चालकाला गाडीतून ओढून बाहेर काढले. गर्दी जमल्यामुळे पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या बारा दिवसांपासून मद्यपी चालक मोकाट आहे. त्याच्या रक्त तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. पोलिसांनीही अहवाल लवकर मिळावा म्हणून तसदी घेतली नाही. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. पोलीस मात्र याबाबत विचारणा करणाऱ्यांवरच प्रश्नांचा भडीमार करतात. त्यामुळे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.

संबंधित गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सोनवणे यांच्याशी संपर्क केला असता, मद्यपी चालकाच्या तोंडाला किरकोळ जखम झाली होती. त्यामुळे त्याला अटक केलेली नाही. येत्या दोन-तीन दिवसात न्याय वैद्यक प्रयोगशाळेतून रक्ताचा अहवाल अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कारवाई होईल असे सांगितले.

या प्रकरणात मध्यरात्री मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्या आणि किरकोळ जखमी संशयीताना पोलिसांकडून सहानुभूती असल्याचे बोलले जाते. यामध्ये गंभीर जखमी आणि सुदैवाने जीवितहानी टाळलेली आहे. मात्र पोलीस गंभीर जखमी जिवांपेक्षा अपघात करणाऱ्या मद्यपी चालकाबाबत सहानुभूती दाखवत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे याबाबत कोणाचा दबाव आहे?. दोषींना अटक का होत नाही?. पुण्याचे प्रकरण ताजे असतानाही पोलीस एवढे निर्धास्त आणि उदासीन कसे असा गंभीर प्रश्न आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT