Milk price hike movement Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Milk Price Hike Movement : 'आताची अंघोळ दुधाची, पुढची...'; ठाकरे गटाचा मंत्री विखेंना इशारा

Pradeep Pendhare

Ahmednagar News : दूध भावाच्या मागणीसाठी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या बालेकिल्ल्यात शिर्डीत शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुतळ्याला ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घेतला.

"दुधाला भाव न मिळाल्यास पुढील काळात यापेक्षा तीव्र आंदोलन करू. पुतळ्याला आताची अंघोळ दुधाची आहे, पुढची अंघोळ शेणाने घालू", असा इशारा यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला. या आंदोलनात स्थानिक शेतकरी सहभागी झाले होते.

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी (Farmer) दुधाला 40 रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, यासाठी आंदोलनं करत आहेत. राज्य सरकारचे लक्ष वेधत आहे. अकोल्यातील शेतकऱ्यांनी देखील दूध दरवाढीसाठी अकोले ते संगमनेर अशी ट्रॅक्टर रॅली काढली. नाशिक महामार्गावर शेण ओतून राज्य सरकारचे लक्ष वेधले. यानंतर आता शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीत मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून राज्य सरकारचे लक्ष वेधले. दुधाला 40 रुपये भाव घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

भाजपचे (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे, दुग्धविकास विभागाचे आयुक्त, शेतकरी आणि आंदोलनकर्ते यांच्या बैठका सुरू आहेत. पण भाव मिळत नाही. असे का होत आहे, असा आरोप करत यामागे सत्ताधारी राजकारण करत अल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे शिर्डी शहरप्रमुख सचिन कोते यांनी केला. दुधाला भाव मिळण्यासाठी आंदोलन सुरूच राहणार आहे, आज शिर्डीत मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे, पुढचे आंदोलन कोणते असेल, याचा विचार सरकारने करावा, आमच्यासह शेतकऱ्यांच्या संयमाचे अंत पाहू नये, असा इशारा देखील सचिन कोते यांनी दिला.

महागाई वाढत चालली आहे. दुधाचा व्यवसाय आता परवडत नाही. सरकार शेतकऱ्यांकडून सर्वकाही काढून घेत आहे. 'जीएसटी'च्या नावाखाली कधी खिशा कापून घेत आहे, हेच कळत नाही. त्यामुळे दुधाला भाव देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आता संयमाने आंदोलन सुरू आहेत. पुढे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुतळ्याला शेणाने अंघोळ घालू, असा इशारा यावेळी देण्यात आला. शिवसेना ठाकरे पक्षाचे राहाता तालुकाध्यक्ष संजय शिंदे , जिल्हासंघटक नानासाहेब बावके यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT