EVM machine change allegation : निवडणूक आयोगाच्या कारभारावर चौफेर टीका होत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत, राहाता नगरपालिका निवडणुकीत प्रशासकीय यंत्रणा कशी दुटप्पी वागली, याबाबत गंभीर आरोप केले.
'काल राहाता इथं गोंधळ घातला गेला, तिथं 'ईव्हीएम' बदलण्यात आले. सुरुवातीला एक 'ईव्हीएम' दाखवण्यात आलं, नंतर दुसरंच तिथं ठेवण्यात आलं,' असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.
भाजप (BJP) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघातील राहाता नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. तत्पूर्वी तिथं काय-काय गोंधळ झाला, यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लक्ष वेधत केलेल्या आरोपांतून खळबळ उडवून दिली. तत्पूर्वी त्यांना निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला.
''ईव्हीएम' (EVM) बाबत संपूर्ण देशाला शंका आहे. तसंच आम्हाला देखील आहे. हे काही करू शकतात. कालच राहाता नगरपालिका निवडणुकीत गोंधळ घातला गेला. तिथं 'ईव्हीएम' बदलण्यात आले. सुरुवातीला एक ईव्हीएम दाखवण्यात आलं. नंतर दुसरंच तिथं ठेवण्यात आलं. हे लोकांनी ओळखलं. तिथं साधी माणसं, प्रचंड शक्तिशाली सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढा देत आहे. हे दिसत असताना, निवडणूक आयोगाच्या कारभारामुळे पुन्हा वीस दिवस या ईव्हीएमची राखण कोणी करायची? आम्हाला काळजी वाटते,' अशी गंभीर प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.
निवडणूक आयोगाने आजच्या मतदानाचा निकाल थेट 21 डिसेंबर तारीख दिली. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, "लोकशाहीमध्ये अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. लोकशाहीमध्ये व्यक्तिगत द्वेषाचं कारण नाही. निवडणूक प्रक्रिया ही स्वच्छ, निकोप अन् निर्दोष असली पाहिजे. साधा कार्यक्रम सुद्धा निर्दोष जाहीर करू शकत नाही, असा निवडणूक आयोग आहे. हे दुर्दैवी आहे. परंतु माझे मत वेगळे आहे. कुणीतरी मंत्रालयातील पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो, असं माझं स्पष्टपणे मत आहे."
'निवडणूक आयोगातील अधिकारी हे उच्चशिक्षित असतात. 'आयएएस' दर्जाचे अधिकारी असतात. अशा अधिकाऱ्यांनी अनेक निवडणुका हाताळलेल्या असतात. त्यातील फायदे-तोटे, दोष=गुण काय असतात, हे त्यांना देखील माहिती असतं. असे असताना हे होऊच कसं शकतं? याला कारण म्हणजे, कुणीतरी मंत्रालयातील पीए कार्यक्रम बनवायचा आणि यांनी तो लावून टाकायचा, कारण की यांना ते बंधन होतं आहे,' असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.
निवडणूक आयोग हा सत्तेचा गुलाम झालेला आहे. हा आरोप जो आहे तो अत्यंत खरा आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना थोरात म्हणाले, "स्वतःवरचं बालंट झाकण्यासाठी, त्यांनी ही सावरा-सावर केली आहे. बाकी यापेक्षा वेगळं काही नाही. यात हस्तक्षेप आहेच आहे." मतदार यादीमधील अनेक दोष आम्ही दाखवलेले आहेत, तरी तहसीलदार ते दूर करू शकत नाही. तसे आम्हाला अधिकार नाहीत, असे आम्हाला उत्तर देतोय. हे कशामुळे करतोय, का दोष दूर होत नाही. हे लोकशाहीची दुर्दैवी अवस्था आहे. सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेपामुळेच हे सर्व होत आहे, हेच त्याच्या पाठीमागील कारण आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.