Vinayak Deshmukh In congress meeting
Vinayak Deshmukh In congress meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress; आगामी निवडणुकीत जळगाव शहरात काँग्रेसचा आमदार!

Sampat Devgire

जळगाव : (Jalgaon) कॉंग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे जनतेला अपील करणारे पत्र आता प्रत्येक घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. २६ जानेवारीपासून ‘हात जोडो’ अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) यांनी दिली. (Congress will take a `Shake hand` drive to every citizen)

जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्याविषयी जनतेत प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेत आता दोन गट झाले आहेत, ते एकमेकांवर आरोप करीत आहेत. त्याचा जनतेला कंटाळा आला आहे. कॉंग्रेसवर जनतेचा पुन्हा एकदा विश्‍वास वाढत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघासाठी उमेदवार दिला जाईल.

कॉंग्रेस भवनात झालेल्या शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र मराठे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, शहर जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत तायडे, उत्तमराव सपकाळे आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रभारी विनायक देशमुख म्हणाले, की कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात ‘भारत जोडो’ अभियान राबविले. त्याचाच विस्तारित कार्यक्रम आता ‘हात जोडो’ अभियान २६ जानेवारीपासून प्रत्येक गाव व प्रभाग पातळीवर राबविण्यात येणार आहे. २६ जानेवारीला प्रत्येक गावांत प्रभातफेरी काढून झेंडावंदन करण्यात येणार आहे. त्यानंतर तब्बल दोन महिने ‘हात जोडो’ अभियान राबविण्यात येणार आहे.

त्या अंतर्गत प्रत्येक गावांत, शहरातील प्रत्येक वॉर्डात पदयात्रा काढण्यात येईल. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे जनतेला अपील करणारे पत्र व मोदी सरकारवर असलेले आरोपपत्र घरोघरी जाऊन देण्यात येईल, तसेच प्रत्येक घरावर ‘भारत जोडो’चे स्टीकर लावण्यात येतील. या अभियानांतर्गत जनतेशी कनेक्ट होणार आहे.

लोकसभा, विधानसभेसाठी तयारी

श्री. देशमुख म्हणाले, की ‘हात जोडो’ यात्रेच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण व शहरी भागात प्रत्येक वॉर्डात जाऊन जनतेशी जुळणार आहोत. या माध्यमातून आम्ही लोकसभा व विधानसभेची तयारी करणार आहोत. त्यासाठी आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यांत कार्यकर्त्यांचा संच तयार करणार आहोत. त्याच माध्यमातून पक्षालाही मजबूती देणार आहोत.

राहुल गांधीचा संदेश पोहोचवा

कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, की ‘हात जोडो’ अभियानांतर्गत प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कार्य करून पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा संदेश घरोघरी पोहोचवावा. जिल्ह्यातील सर्व १८०० गावांमध्ये कार्यकर्त्यांनी घरोघरी राहुल गांधी यांचे पत्र पोहोचवावे, तसेच गावोगावी एलईडी लावून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून मिळालेल्या प्रतिसादाची माहिती जनतेला देऊन पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करावेत, असे अवाहनही त्यांनी केले.

जळगाव शहर विधानसभा लढविणारच

कॉंग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख म्हणाले, की जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्याविषयी जनतेत प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेत आता दोन गट झाले आहेत, ते एकमेकांवर आरोप करीत आहेत. त्याचा जनतेला कंटाळा आला आहे. कॉंग्रेसवर जनतेचा पुन्हा एकदा विश्‍वास वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव शहर विधानसभा निवडणूक कॉंग्रेस लढविणार असून, ती जिंकणारच आहोत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीचे उमेदवारही आम्ही निश्‍चित करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT