Tejaswini Khaire  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hormuz Strait Crisis : होर्मुझमध्ये मृत्यूचा खेळ! राहुरीच्या तेजस्विनीने पाहिले ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्रांचा मारा; तीन महिने जहाजावर अडकून थरारक सुटका

Rahuri marine engineer Tejaswini Khaire recounts three terrifying months trapped Hormuz Strait amid Iran-Israel war tensions and drone attacks : अमेरिका-इस्राईल-इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणावात, होर्मुझमध्ये अडकलेले भारतीयांचे तिरंग्यामुळे जहाज वाचले जहाज, सुखरूप मायदेशी परतलेल्या तेजस्विनी खैरेंचा थरारक अनुभव सांगितला.

Pradeep Pendhare

Indian crew in war zone : अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य तणावामुळे मध्यपूर्वेतील होर्मुझ समुद्रधुनी अक्षरशः रणांगण बनली असताना, राहुरीतील एका तरुणीने तब्बल तीन महिने मृत्यूच्या सावटाखाली समुद्रात अडकून थरारक अनुभव घेतला.

ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्रांचा मारा, जहाजांवरील स्फोट आणि डोळ्यांसमोर होणारे मृत्यू… हे सर्व तिने जवळून पाहिले. दैव बलवत्तर म्हणून या भीषण संकटातून तिची सुखरूप सुटका झाली असून, घरी परतल्यानंतर कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

राहुरी येथील तेजस्विनी अक्षय खैरे या ‘सीएमए सीजीएम मॅनअस’ या मालवाहू कंटेनर जहाजावर बोट इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. मागील तीन वर्षांपासून त्या समुद्री सेवेत असून, सहा महिन्यांच्या करारावर त्या या जहाजावर काम करत होत्या. मात्र, अमेरिका-इस्राईलने 28 फेब्रुवारी रोजी इराणविरोधात (Iran) संयुक्त लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती अचानक चिघळली आणि होर्मुझ समुद्रधुनीत अनेक व्यापारी जहाजे अडकून पडली.

तेजस्विनी कार्यरत असलेले जहाज संयुक्त अरब अमिरातीतील खलिफा बंदरातून अमेरिकेतील ऑरेंज बंदराच्या दिशेने निघाले होते. पण युद्धजन्य (War) परिस्थितीमुळे हे जहाज होर्मुझ समुद्रधुनीतच तब्बल तीन महिने अडकून राहिले. या काळात जहाजावरील 24 कर्मचाऱ्यांनी अक्षरशः मृत्यूच्या छायेत दिवस काढले.

तेजस्विनी यांनी सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. जहाजावरील दिवे पूर्णपणे बंद ठेवले जात होते. हालचालींवर निर्बंध होते. बाहेर सुरू असलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले पाहून सर्वजण प्रचंड घाबरले होते. प्रत्येक क्षणी मृत्यू समोर उभा असल्याची भावना होती, असे त्या म्हणाल्या.

विशेष म्हणजे, मागील सहा महिन्यांत त्यांनी दोन वेळा होर्मुझ समुद्रधुनी पार केली होती. मात्र तिसऱ्या फेरीत युद्धाचा भडका उडाला आणि शंभराहून अधिक जहाजे समुद्रात अडकून पडली. तेजस्विनी यांच्या जहाजावर भारतीय तिरंगा फडकत असल्यामुळे थेट हल्ला झाला नाही. पण आसपासच्या अमेरिकन आणि विदेशी जहाजांवर झालेले हल्ले त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.

काही जहाजांवरील कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यात भारतीय खलाशांचाही समावेश होता. तीन महिने दिवस-रात्र भीतीचे सावट होते. जहाज कंपनीकडून छोट्या बोटीने अन्नपुरवठा केला जात होता. अनेकदा दोन-दोन दिवस उपाशी राहावे लागले, असा धक्कादायक अनुभव त्यांनी सांगितला.

दरम्यान, जहाज खलिफा बंदराकडे हलवले जात असताना इराणी लष्कराने त्यांच्या जहाजावर गोळीबार केला. सुमारे 20 मिनिटे सुरू असलेला तो गोळीबार आयुष्यातील सर्वात भयानक क्षण होता. जहाजाचे किरकोळ नुकसान झाले, पण सुदैवाने जीवितहानी टळली. आमचे जहाज पलायन करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर गोळीबार थांबवण्यात आला, असे तेजस्विनी यांनी सांगितले.

यानंतर जहाज पुन्हा खलिफा बंदरात परतले. तेजस्विनी यांचा सहा महिन्यांचा करार संपल्याने जहाज कंपनीने त्यांची सुटका केली. जहाजावरील 24 पैकी 9 कर्मचारी आपल्या घरी परतले असून, अद्याप 15 कर्मचारी जहाजावरच कार्यरत आहेत.

तेजस्विनी या युद्धसंकटात अडकल्यामुळे खैरे कुटुंबीय प्रचंड चिंतेत होते. अखेर त्या सुखरूप परतल्याने कुटुंबात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समुद्रावर काम करताना अनेक संकटे पाहिली, पण मागील तीन महिन्यांत अनुभवलेली भीती आयुष्यभर विसरणार नाही, अशी भावना तेजस्विनी यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT