Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

'पवारसाहेबांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी एखादी टरबूज-खरबूज सोसायटी तरी काढली का?'

सरकारनामा ब्यूरो

नाशिक : लोकांमध्ये जे विष पेरत आहेत, त्यांनी एखादी संस्था, एखादा कारखाना उभा केला का? साधी विकास सोसायटी नाही, टरबूज-खरबूज सोसायटी तरी काढली का? सोसायटी म्हणजे काय हे त्यांना कळत नसले. लोकांचे संसार उभे करण्यासाठी अक्कल लागते. धुडगूस घालायला अक्कल लागत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला.

अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा शिवसृष्टीचे येवला शहरात अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमानंतर पवार बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्याचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, शरद पवार फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत तर त्यांच्या विचारांवर चालण्याचे काम करतात. आमच्या ह्‌दयात, रक्तात, नसानसात शिवाजी महाराज आहेत. फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपले दुकान चालवणाऱ्यांना महाराज समजलेच नाहीत, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्र्यांनी केला.

बोलणाऱ्यांचे जेवढे वय आहे तेवढे शरद साहेबांचे काम आहे. भाषण म्हणजे काय याची नक्कल कर त्याची नक्कल कर, भाषण करायला आले का नकलाकार आहेत. कधी आमच्याकडून एखादा शब्द चुकला तर आम्ही माफी मागतो. या सगळ्यातून तुमच्या माझ्या रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही. राज्यात गुंतवणूक आल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. गुंतवणूक करणारे राज्यातील वातावरण बघतात. वातावरण चांगले नसेल तर गुंतवणुकीवर परिनाम होतो, असेही अजित पवार म्हणाले.

आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दूपारी सभा घेतली का असा सवाल अजित पवार यांनी केला. कधी कष्ट घेतले आहेत का? यांची सभा कधी संध्याकाळी. उगीच लोकांची दिशाभूल करायची, हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला परवडणारे नाही. राजकीय स्वार्थापोटी समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरु आहे. चांगले वातावरण गढूळ करण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT