Raj Thakre
Raj Thakre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज ठाकरेंचा राज्यात दबदबा, मात्र `या`मुळे धुळ्यात इंजिन साईडींगला!

Sampat Devgire

धुळे : धुळ्यात (Dhule) पदाधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवू शकेल, दिशा देऊ शकेल, असा दमदार चेहरा मनसेला (MNS) अद्याप गवसलेला नाही. पक्षात स्थानिक नेत्यांत ‘ज्युनिअर-सीनिअर’ या सुप्त वादाने जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मनसेचे इंजीन साइडला पडले आहे. त्यात वरिष्ठ पातळीवरून राज ठाकरे (Raj Thakre) यांनीही लक्ष घातलेले नाही.

धुळे शहरातील मनसेतील स्थिती सुधारण्यास वरिष्ठांचे देखील दुर्लक्ष असल्याने या पक्षाचा जिल्ह्यातील प्रभाव निस्तेज दिसत आहे. मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यात दबदबा आणि पक्षसंघटनाअभावी जिल्हास्तरावर प्रभाव नाही, असे विसंगत चित्र दिसते.

पक्षांतर्गत गटबाजी आणि तक्रारींमुळे वरिष्ठांनी शहर व जिल्हा कार्यकारिणीत बदल केले. नव्या दमाच्या तरुणांकडे पक्षाची सूत्रे सोपविली. त्यामुळे जुने कार्यकर्ते साइडला पडले. केवळ पक्षाचे अध्यक्ष ठाकरे यांच्यामुळे मानपान बाजूला ठेवून कार्यकर्ता म्हणून पक्षात असल्याचा दावा जुने काही कार्यकर्ते करतात. खांदेपालटानंतर कार्यकारिणीतील नवे चेहरे मात्र जुन्या कार्यकर्त्यांना फारसे काही विचारत नाहीत. तुम्ही पूर्वी पक्षासाठी काय केले, असा प्रतिप्रश्‍न उपस्थित करून जुन्या कार्यकर्त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा परिणाम पक्षात ज्युनिअर-सीनिअर असा सुप्त वाद दिसतो. त्यामुळेही पक्षाचे विस्तारीकरण खुंटले आहे.

मनसेच्या नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडून शहरासह जिल्ह्यात वेळोवेळी विविध प्रश्‍नांवर आंदोलने केली जातात. त्यातून पक्ष प्रतिमा उजाळण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र, प्रश्‍नाच्या निराकरणासाठी आणि मनसे मतदारांच्या मनात बिंबण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा ठोस पाठपुरावा दिसून येत नाही. त्यामुळे केवळ निवेदन देऊन आपले काम संपले, असा आविर्भाव असेल, तर मनसे तळागाळापर्यंत रुजणे अशक्यप्राय असेल. शिवाय पदांसाठी पक्षात असणे आणि पदांच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील गरीब, सर्वसामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावणे यातील फरक ज्याने-त्याने समजून घेणे महत्त्वाचे ठरत असते. यात पोलिसांच्या केसेस अंगावर घेत संघर्ष, लढाऊ बाणा दाखवावा लागतो, तेव्हा जनमानसात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रतिबिंब ठसते. मग स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रवेश होऊन सत्तेच्या माध्यमातून आणखी लोकसेवा करता येते. या प्रेरित विचारांचा अभाव दिसत असल्याने मनसेचे इंजीन जिल्ह्याच्या राजकीय पटलावर साइडला पडलेले दिसते.

प्रभावनिर्मितीची नामी संधी

विकसनशील धुळे शहर व जिल्हा सध्या विविध समस्यांमध्ये अडकला आहे. धुळे शहरात नागरी समस्यांचा गुंता वाढत चालल्याने मनसेला प्रभाव निर्माण करण्याची नामी संधी आहे. यात पक्षांतर्गत सर्वांनी मतभेद व मनोभेद बाजूला ठेवून आणि पक्षाचे अध्यक्ष ठाकरे यांच्या प्रतिमेच्या आधारे धुळेकरांसाठी दिलासादायक कार्य उभारण्याची गरज व्यक्त होते. पक्ष स्थापनेपासून स्थानिक पातळीवर संघटनवाढीचा मुद्दा अडगळीतच पडलेला दिसतो. पक्षांतर्गत येथे कुणी कसे काम करावे याबाबतही निर्बंध लादले जात असल्याने काही सेलचे सक्रिय कार्यकर्ते शांत बसून आहेत. मनसेचे जिल्हा संघटक साक्री तालुक्यातील असूनही साक्री नगर परिषदेच्या होत असलेल्या निवडणुकीत मनसेला एकही उमेदवार देता आला नाही. काम नाही, शाखा नसतानाही महापालिकेच्या प्रभाग पाचच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देऊन मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी हौस भागवून घेतली. त्याचा परिणाम संबंधित उमेदवाराला फक्त १४० मते मिळाली. दोंडाईचा येथील मनसेचे एकमेव व विजयातून हॅट्‍ट्रिक साधणारे नगरसेवक हितेंद्र महाले व भावना महाले यांचे कार्यकारिणीत कुठेही प्रबळ स्थान दिसत नाही. असे विविध समस्यांमध्ये रुतलेले मनसेचे इंजीन रुळावर कसे येईल आणि कोण ते रुळावर आणेल, याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा असेल, तर धुळेकरांना औत्सुक्य!

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT