Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Waje Politics: निळवंडे पाण्याचा वाद, खासदार वाजे संतापले, दिला "हा" इशारा

Sampat Devgire

Rajabhau Waje News: निळवंडे धरणाच्या पाण्यावरून सिन्नर आणि नगर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये वाद सुरूच आहे. सिन्नरच्या दुष्काळग्रस्त सर्वांसाठीचे पाणी अन्यत्र वळविल्याने नवा वाद सुरू झाला आहे. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांतच आरोप, प्रत्यारोप झाले.

निळवंडे (अकोले) धरणातील पाण्याचे वितरण गेले काही वर्ष रखडले होते. आता या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नव्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. यंदा पूर चाऱ्यांचे पाणी अन्यत्र वळविल्याने सिन्नरच्या तहानलेल्या गावांमध्ये नवी समस्या निर्माण झाली आहे.

यावरून खासदार राजाभाऊ वाजे यांनी पाटबंधारे विभागाला इशारा दिला आहे. निळवंडे धरणातून सध्या पाटाला पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सिन्नरच्या अवर्षणग्रस्त गावांसाठी देखील राखीव आहे.

मात्र या गावापर्यंत पाणी पोहोचण्याआधीच ते संगमनेरच्या उसाच्या क्षेत्राकडे वळविण्यात आले. त्यासाठी संगमनेरच्या नेत्यांनी हा वाद निर्माण केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संगमनेर कारखान्याच्या प्रशासनावरही टीका करण्यात आली आहे.

पाटबंधारे विभागाने बघ्याची भूमिका घेतल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. आता या प्रश्नात थेट खासदार वाजे यांनीच उडी घेतली आहे. श्री वाजे यांच्या विधानसभा सदस्याच्या कालावधीत निळवंडे धरणातील पाण्याचा काही भाग सिन्नर पूर्व भागातील दुष्काळी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सिन्नरची ही दुष्काळी गावे तहानलेली असताना त्यांच्या हक्काचे पाणी अन्यत्र वळविल्याने पाण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत खासदार वाजे यांनी पाटबंधारे विभागाला पत्र लिहिले आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

सिन्नरच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या जाणवते आहे. विशेषता मलढोण, सायाळे, कहांदळवाडी, दसंगवाडी, वारेगाव, पाथरे ही दुष्काळी गावे आहेत. या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक तलाव निळवंडे धरणाच्या चारीने भरण्यात येतात.

पाटबंधारे विभागाने चारीला पाणी सोडल्यानंतर सध्या हे पाणी तळेगाव येथून चिंचोली गुरव परिसरातील उसाच्या शेतीचे बंधारे भरण्यासाठी वळविण्यात आले. त्यामुळे सिन्नरचा हा परिसर पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

या संदर्भात खासदार वाजे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी पाटबंधारे विभागाने तातडीने हस्तक्षेप करून सिन्नरच्या तहानलेल्या गावांना त्यांच्या हक्काचे पाणी पूर्वेकडे वळवावे अशी मागणी केली.

ते म्हणाले, एका बाजूला प्यायला पाणी नाही. दुसरीकडे हक्काचे पाणी ऊसाच्या सिंचनासाठी वळविले जात आहे. ही अतिशय अमानवी बाब आहे. माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात सातत्याने संघर्ष करून सिन्नरच्या या गावांना निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.

पाणी पळविण्याचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. प्रशासनाने याबाबत तातडीने हस्तक्षेप न केल्यास वेगळा विचार करावा लागेल. त्याची सर्व जबाबदारी पाटबंधारे विभागावर असेल असा इशारा श्री वाजे यांनी दिला आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT