Rajabhau Waje News: शहरातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या नाशिक पुणे रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. नागरिक बेजार आहेत. आता यावर संतप्त खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी आचारसंहितेच्या तोंडावरच नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती आणि अस्तरीकरण करण्यात आले. त्यावर सुमारे वीस कोटी रुपयांचा खर्च झाला. मात्र अवघ्या दोन महिन्यात या रस्त्याची चाळण झाली आहे.
रस्त्यावर प्रचंड खड्डे झाल्याने वाहतुकीची गती मंदावली. रोज अपघात होत असल्याने अनेक नागरिक जायबंदी होत आहेत. याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्याची दखल खासदार वाजे यांनी घेतली आहे.
रोजच मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याने वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे वाजे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयालाच अल्टीमेटम दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला या रस्त्यावरील खर्च खरोखर झाला आहे का?. कामाची गुणवत्ता तपासली आहे का? प्रशासकीय पूर्तता केली आहे का? आणि तसे असेल तर या रस्त्याची एवढी दुरावस्था झाली याला जबाबदार कोण? असा प्रश्न खासदार वाजे यांनी केला आहे.
द्वारका ते नाशिक रोड दरम्यानच्या नाशिक पुणे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १९.४२ कोटी रुपये खर्च झाले. त्यातून रस्त्याचे अस्तरीकरण करण्यात आले. असे असतानाही प्रचंड खड्डे झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर चिखल धूळ आणि निसरडा रस्ता अशी स्थिती आहे.
रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे सर्वाधिक वाहतूक असलेल्या या भागातील नागरिकांची प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावरून जावे लागते. या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात कामाच्या दर्जाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या महामार्गाच्या कामाचा दर्जा आणि उनिवा लक्षात घेऊन संबंधित ठेकेदारावर गंभीर कारवाई करावी. रस्त्याच्या ठेक्याच्या नियमावलीचे पालन झाले आहे का? रस्त्याच्या डाग डुजीला ठेकेदाराला जबाबदार धरण्यात आले आहे का? आणि तसे नसेल तर तातडीने या रस्त्याची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करण्यात यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
याबाबत संतप्त झालेल्या खासदारांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित विभागांना पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. पंधरा दिवसात संबंधित रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यास नागरिकांसह प्रशासनाला जाब विचारण्यात येईल या विरोधात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या नाशिक शहरातील बहुतांश रस्त्यांची अशीच दुरावस्था झाली आहे. त्याविषयी मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. रस्त्याची कामे केल्यानंतर देखील दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेने कंत्राटदारांवर ३१ कोटींची खैरात केली आहे. याबाबत शहरातील आमदारांनीही गेल्या आठवड्यात आक्रमक होत आयुक्तांना जाब विचारला होता. आमदारांनी देखील प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. अल्टिमेटम वर काम करणारे प्रशासन नागरिकांची सुरक्षितता आणि रस्त्यांची दुरुस्ती यावर किती गंभीर आहे हे लवकरच स्पष्ट होईल.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.