Sangamner black magic case : दुर्धर आजार मंत्राने बरे करतो, दैवी चमत्काराने दारू-व्यसन सोडवतो, मूल नसणाऱ्या महिलांना मंत्रोच्चाराने मूल देतो, घरातील समस्या मंत्रशक्तीद्वारे दूर करतो, असा दावा करत भक्तांची आर्थिक फसवणूक करायचा.
असा हा भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे उर्फ दत्तधाम सरकारसह त्याच्या पाच सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईचे अंनिसने स्वागत केले आहे.
भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे उर्फ दत्तधाम सरकार, डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (तिघेही रा. वडगावपान, ता. संगमनेर) (Sangamner) आणि सूरज शिंदे, मधूकर शिंदे (दोघेही रा. रहिमपूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी फिर्याद दिली आहे.
धार्मिक, आध्यात्मिकतेच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजेंद्र बापू गडगे महाराजाच्या भोंदूगिरीविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रारी अर्ज दिला होता. या तक्रारीचा फिर्यादी अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी वरिष्ठ पोलिसांपर्यंत (Police) पाठपुरावा केला होता. याच दरम्यान, संबंधितांनी सोशल मीडियात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करणारा व्हिडिओ शेअर केला होता.
फिर्यादी अॅड. रंजना पगार-गवांदे अन् अंनिसच्या राज्याचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेवला. नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरातसारखे प्रकरण व्हायची वाट पाहायची आहे का? असा सवाल करत पोलिस अन् जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर अंनिसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
अंनिसच्या पाठपुराव्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा राजेंद्र गडगे महाराजविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मागदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली.
भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013चे कलम तीनसह ड्रग्स ॲण्ड मॅजिक रेमिडिज ॲक्ट 1654 चे कलम सात मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्टचे कलम 33.36 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र गडगे महाराजाच्या भोंदूगिरीबाबत राज्यभरातून अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे तेथील चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, संगमनेर उपविभागीय अधिकारी तसेच संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.