Ravindra Pagaar death Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ravindra Pagar Death : धक्कादायक ! राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांचे निधन

NCP leader Ravindra Pagar Death : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सन २०१२ पासून ते जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

Ganesh Sonawane

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दु. ३ वाजता उत्राने, ता.बागलाण जि. नाशिक येथे होणार आहे.

सन २०१२ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार, मंत्री छगनरावजी भुजबळ यांचे निकटवर्तीय असलेल्या ॲड. रविंद्रनाना पगार यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणून काम केले होते.

संघटनात्मक कामकाजाचा सुमारे ४० वर्षांचा अनुभव असलेल्या ॲड. रविॅद्र पगार यांनी एकत्र काँग्रेसमध्ये युवक काँग्रेस व NSUI या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्षपद देखील यशस्वी रित्या सांभाळले होते.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच विविध जिल्ह्यांना निरीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केले होते.

सन १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर राज्यात सर्वप्रथम ॲड.रवींद्रनाना पगार यांनी नाशिक येथील मामा मुंगी मंगल कार्यालयात शरद पवारांच्या समर्थनाथ मेळावा घेतला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व. अजित पवार व ना.छगन भुजबळ यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ॲड. रविंद्रनाना पगार या दोन्ही नेत्यांच्या पाठीशी संपूर्ण संघटना एकसंघ ठेवली होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शोक व्यक्त केला जात आहे.

28 जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. दादांच्या निधनाने आख्खा महाराष्ट्र शोकाकुल आहे. त्या धक्क्यातून पक्ष आजून पूर्णपणे सावरत नाही तोच नाशिकमध्ये जिल्हाध्यक्षांच्या निधनाने पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांना मोठा धक्का बसला आहे.

मंत्री छगन भुजबळांकडून श्रद्धांजली

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ सहकारी ॲड. रवींद्र पगार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

पक्षाचे एक निष्ठावान व सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे व 'नाना' म्हणून प्रसिद्ध असलेले ॲड. पगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून झटत आले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात, विविध निवडणुकांमध्ये त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजवली. आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी सदैव जनहितासाठी केला. जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहिले. ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठोस भूमिका घेतली.

त्यांच्या निधनाने एक कुशल संघटक,अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. पगार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT