Dhule Municiple corporation
Dhule Municiple corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपमधील वाढती खदखद: केव्हाही स्फोट होण्याची शक्यता?

Sampat Devgire

निखिल सूर्यवंशी

धुळे : नागरिकांनी मोठ्या विश्‍वासाने भारतीय जनता पक्षाकडे (BJP) सत्ता (Dhule) सोपविली. त्या विश्‍वासाला आपण पात्र ठरत आहोत का? यावर आत्मचिंतनाची वेळ भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांवर आली आहे. मोजके पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य तुपाशी, तर इतर उपाशी राहत असल्याने भाजपमध्ये मोठी खदखद आहे. तिचा केव्हाही स्फोट होऊ शकतो, असे कार्यकर्ते खासगीत सांगतात.

काँग्रेससह इतर विरोधकांची मक्तेदारी संपवून जिल्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह विविध पक्षांचे प्रबळ, सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांनाही भाजपने आपल्या तंबूत दाखल करून घेतले. याबळावर पूर्वी नगण्य ताकद असलेल्या भाजपची सत्ताधीशाकडे वाटचाल सुरू झाली. यात धुळे महापालिका, जिल्हा परिषद, शिंदखेडा, दोंडाईचा आणि शिरपूर पालिका ताब्यात आली. साक्री नगर परिषदेच्या होत असलेल्या निवडणुकीत भाजप नशीब अजमावत आहे. साक्रीसह धुळे शहर व ग्रामीण मतदारसंघ वगळता शिंदखेडा, शिरपूर येथेच भाजपला आमदारकी मिळाली आहे.

नाराजीच्या लाटेशी सामना

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग पाचमधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश करत विजय मिळविला. या यशाने भाजपची महानगर शाखा हुरळून गेली. प्रत्यक्षात भुयारी गटार योजना व खोदकामामुळे ठिकठिकाणी रस्त्यांची दुरवस्था, कचरा संकलन, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, जलकुंभ, एलईडी दिवे, वाढते अतिक्रमण, मनोरंजनाच्या साधनांचा अभाव आदींबाबत शहराचे तीनतेरा वाजल्याने नागरिकांची मनपतील सत्ताधारी भाजप व नेत्यांवर कमालीची नाराजी दिसते. असे असताना महाविकास आघाडीचा कमकुवत उमेदवार आणि लक्ष्मीदर्शनाच्या योगातून प्रभाग पाचची जागा भाजपने जिंकल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. याद्वारे नाराजी असली तरी मौलिक योग दर्शनातून निवडणूक जिंकता येते, असा गैरआत्मविश्‍वास भाजपमध्ये पेरला गेला आणि प्रभाग पाचद्वारे चुकीचा संदेश समाजात पोचला आहे.

‘साथ-साथ है’ची कार्यशैली

अडीच वर्षांत मनमानी व दिशाहीन कारभारामुळे येथील महापालिकेची तिजोरी जवळपास रिकामी झाली आहे. स्पिल ओव्हरद्वारे महापालिकेला सरासरी ६० ते ८२ कोटींच्या खड्ड्यात घालण्यात आले आहे. मार्च- एप्रिलपर्यंत मंजुरीच्या अपेक्षेतील बजेट महापालिकेत अद्याप थंड बस्त्यात पडून आहे. यातून भाजपचे स्थानिक नेते, प्रमुख पदाधिकाऱ्यांचे महापालिकेवर नियंत्रण नाही, हे स्पष्ट होते. जिल्हा परिषदेतही फार वेगळी स्थिती नाही. तक्रारींनुसार काम होण्यापूर्वीच बिल काढणे, काम झालेले नसताना बिल काढणे, उपअभियंता असतानाही कनिष्ठ अभियंत्यांकडे कार्यकारी अभियंत्याचा कारभार सोपविणे, मनपाप्रमाणेच प्रशासन व पदाधिकारी ‘साथ-साथ है’ या पद्धतीच्या कार्यशैलीतून जिल्हा परिषदेचा गाडा हाकण्यात भाजपकडून धन्यता मानली जात आहे. काही कारणांमुळे दोंडाईचा पालिकेची आगामी निवडणूक भाजपला जड जाण्याची चिन्हे आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT