Dr. Radhakrishna Vikhe Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe Patil News : आमदार देवयानी फरांदे यांच्या भूमिकेला जोर का झटका!

महसूल मंत्री डॉ. विखे- पाटील म्हणाले, पांजरपोळ संस्थेला अधिक बळ देण्याची आवश्‍यकता

Sampat Devgire

Nashik Panjrapol Land issue : पांजरपोळची जागा एमआयडीसीसाठी घेण्याऐवजी पांजरपोळ संस्थेला अधिक बळ देण्याची आवश्‍यकता आहे. शासनाचीदेखील तिचं भूमिका आहे. गोसेवेचे चांगले कार्य होत असल्याने वृक्षतोडीला विरोध असल्याचे मत राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी मांडताना अप्रत्यक्ष पांजरपोळच्या जागेसाठी आग्रही असलेल्या भाजप नेत्यांसाठी मोठी चपराक मानली जात आहे. (Dr. Vikhe Patil given middle way suggestion for Nashik Land issue)

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीच्या (MIDC) विस्तारासाठी शहराचा (Nashik) ऑक्सीजन झोन असलेल्या पांजरापोळ संस्थेच्या पडीत व जंगल असलेल्या जमिनीचे संपादन करण्याची सुचना केली होती. त्यावरून शहरातील अनेक संस्थांनी त्याला विरोध केला होता. आता त्या भूमिकेला महसूलमंत्री डॉ. विखे- पाटील (Dr. Radhakrishna Vikhe-Patil) यांनीही पांजरापोळ संस्थेची बाजू घेतल्याने भाजपच्या मंत्र्यांकडूनच आमदारांचे कान टोचण्याचा प्रकार घडला.

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या पांजरपोळच्या जवळपास साडेआठशे एकर जागा औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करून त्या जागेवर उद्योग निर्माण करावे, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली होती. त्याअनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे बैठक झाली.

पांजरपोळच्या जागेसंदर्भात पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची कमिटीदेखील नियुक्त केली. एकीकडे राज्य शासनाकडून पांजरपोळची जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना दुसरीकडे पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीसह जागा हस्तांतरित करण्यास विरोध दर्शविला. आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील उघड विरोध केला.

आता त्यापाठोपाठ महसुल मंत्री विखे- पाटील यांनी विरोध दर्शविल्याने पांजरपोळच्या जागेचा विषय गुंडाळण्यात आल्याचे बोलले जात आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संस्थेच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आले असता माध्यमांशी संवाद साधताना विखे- पाटील यांनी विरोध दर्शविला. पांजरपोळ संस्था चांगले काम करत आहे.

या जागेवर एमआयडीसी उभारण्याऐवजी संस्थेला बळकटी देण्याची आवश्‍यकता आहे. पांजरपोळमध्ये भाकड गायींची देखभाल केली जाते. गाय संवर्धनाचे काम संस्था करत असल्याने पांजरपोळ सक्षमीकरणाचे काम केले जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT