<div class="paragraphs"><p>Dy CM Ajit Pawar</p></div>

Dy CM Ajit Pawar

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

अजित पवारांची पाठ फिरताच भुसावळकरांवरील त्यांची ‘पॉवर’ संपली?

Sampat Devgire

भुसावळ : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नुकताच पालिकेच्या कामांचे उद्‌घाटन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी चार वर्षांचे काम अवघ्या चार दिवसात करण्यात आले. मात्र ते परत जाताच पहिल्या पावसात नव्हे, तर गटाराच्या पाण्याच्या डबक्याने रस्त्याची वाट लागण्यास सुरुवात झाली आहे.

नाशिक विभागात ‘अ’ वर्ग पालिका व जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या भुसावळ शहराच्या रस्त्यांची वाट लागली होती. मात्र अंतर्गत रस्त्यांनी कात टाकली. प्रभागनिहाय नगरसेवकांनी आपल्या प्रभागाचा गल्ली बोळाचे रस्ते केले. मात्र मुख्य रस्त्यांची दैना कायम आहे. रस्त्यांमुळे नागरिकांना पाठीचे आजार उद्भवत आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या भुसावळ दौऱ्यामुळे रस्त्यांची काया पालटली. पवार यांच्या मार्गावरुन भुसावळ शहरात दाखल होणार रस्ते अवघ्या काही दिवसात चकाचक झाले.

या कामांमुळे तात्पुरता का होईना नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र पवारांना माघारी जाऊन काही दिवस उलटले नाही, तोवर यावल रोड शहर पोलिस ठाण्यापुढे गोलाई वळणावर नुकत्याच झालेल्या रस्त्यावर गटारीच्या पाण्याचे डबके साचले व एकाच दिवसात रस्त्याचा ‘दर्जा’ नागरिकांच्या समोर आला. म्हणतात की पहिल्या पावसाळ्यात रस्त्यात कामाचा दर्जा ओळखला जातो. मात्र पहिला पाऊस तर दूर गटारीच्या जमलेल्या पाण्याने रस्त्याची वाट लावून टाकली.

पवारांची ‘पॉवर’ इतकी होती की शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी पालिकेच्या कारवाई आधीच स्वतः हून टपऱ्या, रस्त्यावर टाकलेल्या दुकाने काढले होते. शहराला अच्छे दिन येतील, विद्रूप झालेले रस्ते पुन्हा चांगले दिसतील, अशी अपेक्षा असताना पवारांना माघारी जाऊन चोवीस तास झाले नसतील पुन्हा या मार्गावर अतिक्रमण ‘जैसे थे’ झाले. त्यामुळे पवार यांची पाठ फिरताच भुसावळकरांवरील त्यांची ‘पॉवर’ नाहीशी झाली की काय असा प्रश्न पडतो.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT