Rohini Khadse : जालना जिल्ह्यातील परतुर मतदारसंघाचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्याच्या मायचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बुट, चप्पल सुद्धा सरकारमुळेच असल्याचे लोणीकर म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर संतापाची लाट उसळली आहे.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी बबनराव लोणीकर यांच्या या विधानावरुन त्यांना लक्ष केलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष व एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी लोणीकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रोहिणी खडसे यांनी एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, सोशल मीडियावर आपल्या विरोधात व्यक्त होणाऱ्या तरुणांविषयी भाजपचे आमदार बघा कसं बोलत आहेत. ही या लोकांची भाषा, त्यांचा अहंकार, त्यांची संस्कृती आहे !
रोहिणी खडसे यांनी पुढे म्हटलं आहे की, आमदार महोदय, तुमचे शेठ जो २५ लाखांचा सूट घालतात तो सामान्य जनतेमुळे मिळाला आहे, लाखो रुपयांचा गॉगल घालतात ती सामान्य जनतेची देण आहे. इतकेच काय तुम्ही राहता तो बंगला, फिरवता ती गाडी जे काही मिळालंय ते जनतेच्या आशीर्वादाने मिळाले आहे, त्या मुलांच्या आईबापांमुळे मिळाले आहे. एवढा माज बरा नव्हं लोणीकर ! हीच जनता लोण्याचे तूपही करू शकते हे लक्षात असू द्या ! अशा भाषेत लोणीकर यांचा रोहिणी खडसे यांनी समाचार घेतला आहे.
नेमकं काय म्हणाले होते लोणीकर?
ते कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट, चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?" या भाषेत लोणीकर बोलले.
दरम्यान बबनराव यांच्या या वक्तव्यावरुन विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आक्रमक होत त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. लोणीकर यांनी शेतकऱ्यांचा मोठा अपमान केला असून त्यांच्यावर चहुबाजुने टीकेची झोड उठली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.