Rohit Pawar, Devendra Fadnavis News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar On Onion Issue : जखम डोक्याला अन् मलम पायाला ! कांदा निर्णयावरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : गेले अनेक महिने कांद्याला भाव नसताना किंवा अतिवृष्टीमुळे खराब होत असताना उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारने थोडा बरा भाव मिळू लागताच निर्यातीवर थेट 40 टक्के कर लावला. यावर आक्रमक झालेले शेतकरी आणि संघटनांचे उग्र रूप पाहून केंद्राने तातडीने 2 लाख क्विंटल कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाठपुरावा करून केंद्र सरकार (Central Government) कडून मंजूर करून घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार यांनी फडनवीसांचा खोचक शब्दात टोला लगावला.

रोहित पवार यांनी ट्विट करत, फडणवीस यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या अद्याप समजलीच नसल्याचे म्हटले आहे. या समस्येवर फडणवीसांच्या विनंतीने केंद्राने जो मार्ग काढलाय त्यावरही, "फडणवीस साहेब जखम डोक्याला आणि मलम पायाला" असा टोला लगावला. तुमच्या राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका. एकट्या नाशिक जिल्ह्यात दररोज १ लाख क्विंटल कांद्याची आवक आहे. केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार म्हणजे केवळ २० दिवसाची आवक खरेदी करणार. त्यानंतर काय ? खरेदीसाठी ही मर्यादा का ?, असा शेलका प्रश्न रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीसांना केला आहे.

राज्यात 40 लाख मेट्रिक टन कांदा अद्याप शेतकऱ्यांच्या कडे पडून आहे. व्यापाऱ्यांची कांदा साठवणूक वेगळी आहे. या परिस्थितीत कांदा निर्यात करूनच उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी भाव मिळणार आहे. या परिस्थितीत थेट 40 टक्के निर्यात कर लावल्याने विदेशातील मागणी थंडावल्याने देशातील कांदा दर पुन्हा कोसळणार आहेत.

नाफेड कडून खरेदी करताना सध्या बाजारात 2 हजार 800 असा भाव असताना सरकार 2 हजार 410 रुपये कमी भाव देणार असल्याबद्दल रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. साठवलेला 30 ते 40 टक्के कांदा खराब झालेला आहे. कांद्याचे भाव पडत असताना दुर्लक्ष करणारे सरकार बरा भाव मिळू लागताच लगेच हस्तक्षेप करत असल्याबद्दल हे कसले धोरण हा कसला न्याय ? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT