Bhujbal Vs Kande News: सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वच इच्छुक आणि प्रस्थापितांचे राजकीय डावपेच जोरात आहेत. यामध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांनी गांधीगिरीच्या माध्यमातून आपल्या वेगळ्या राजकारणाचे संकेत दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या Elections हालचाली जोरात आहेत. नांदगाव मतदारसंघात आमदार सुहास कांदे यांनी धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर भर दिला आहे. मात्र या सगळ्यांमध्ये जनतेच्या खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र होते. त्याचे उत्तर माजी खासदार समीर भुजबळ Sameer Bhujbal यांनी शोधले आहे.
माजी खासदार भुजबळ यांनी नांदगाव, मनमाड शहराच्या जनतेची ही नस पकडली आहे. या दोन्ही शहरांत सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. नगरपालिका प्रशासन त्यावर उपाय करू शकलेली नाही. परिणामी शहरात डेंगूची साथ पसरली आहे.
नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत. अनेक साथीच्या आजारांनी लहान मुलांना ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून माजी खासदार भुजबळ यांच्या अनुयायांनी थेट हातात झाडू घेतला.
शहराची स्वच्छता करून कीटकनाशकांची फवारणी केली. नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश आणि आरोग्य विषयक जनजागृतीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगली चर्चेचा विषय ठरली आहे.
बदलत्या हवामानामुळे आणि नांदगाव शहरात वाढलेला कचरा अस्वच्छता ही नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे. सबंध परिसरात चिकनगुनिया, डेंग्यू, थंडी तापासह विविध आजारांचा प्रादुर्भाव होता. या आजारांच्या रुग्णांची मोठी संख्या असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी खासदार भुजबळ यांच्या सूचनेनुसार हे स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे.
नांदगाव आणि मनमाड शहरातील नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेतल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे. जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर यासह विविध साहित्याचाही त्यात उपयोग करण्यात आला.
माजी खासदार भुजबळ यांची ही गांधीगिरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक राजकीय पाऊल आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र यानिमित्ताने महायुतीच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट येणार, असा संदेश गेला आहे.
नांदगाव मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे आमदार आहेत. समीर भुजबळ आणि कांदे दोघेही महायुतीचे घटक आहेत. मात्र नांदगावच्या राजकारणात कांदे आणि भुजबळ हे दोन प्रतिस्पर्धी राजकीय गट आहेत.
बाजार समिती, नगरपालिकेपासून तर सर्वच निवडणुकांमध्ये हे दोन्ही गट एकमेकांविरोधात मैदानात उतरतात. त्यामुळे महायुतीचे घटक असले, तरीही विधानसभा निवडणूक त्याला अपवाद ठरण्याची शक्यता नाही. यापूर्वी दोन टर्म पंकज भुजबळ हे नांदगावचे आमदार होते.
आता अधिक आक्रमक आणि कल्पक राजकारणी अशी प्रतिमा असलेले माजी खासदार समीर भुजबळ नांदगाव मतदार संघातून कांदे यांना आव्हान देण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने दोन्ही गटांकडून जोरदार हालचाली होत आहेत. यात महायुतीमध्ये चांगलेच धमासान होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला माजी खासदार भुजबळ यांनी एक प्रकारे गांधीगिरीने सुरुवात केली आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.