Sandip Gulave, vivek kolhe Teachers Constituency 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kishor Darade : त्या बेपत्ता उमेदवाराची माघार, दबाव तंत्र की ऐच्छिक?

Sampat Devgire

Kishore Darade News: शिक्षक मतदारसंघातून आज नाम साधर्म्य असलेले किशोर प्रभाकर दराडे या अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. ही माघार घ्यावी यावरून आमदार किशोर दराडे यांनी प्रचंड वादावादी केली होती.

आता आमदार दराडे यांच्याशी साधर्म्य असलेल्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. प्रमुख उमेदवार विवेक कोल्हे आणि ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या उमेदवारांची माघार होते की त्यांचे नाव मतदार यादीत राहते, ही उत्सुकता कायम आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोपरगाव येथील किशोर प्रभाकर दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्याशी त्यांचे नाम साधर्म्य होते. त्यामुळे आमदार दराडे यांच्या समर्थकांनी त्या उमेदवाराला महसूल कार्यालयातच मारहाण करून दहशत निर्माण केली होती. हे प्रकरण पोलिसात गेले होते. यासंदर्भात पोलिस ठाण्यात देखील प्रचंड गदारोळ झाला होता. आमदार किशोर दराडे समर्थकांनी त्यांना ताब्यात देण्याची मागणी करीत रात्री बारा वाजेपर्यंत गोंधळ सुरू ठेवला होता.

अपक्ष उमेदवार दराडे हे प्रचंड दबावाखाली आल्याने दहशतीत होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. पोलिस बंदोबस्तात घरी सोडण्याचे आदेश असतानाही अपक्ष उमेदवार बेपत्ता झाले होते.

गेले चार दिवस बेपत्ता झालेले दराडे आज महसूल आयुक्त कार्यालयात आले. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली यामागे कोण असेल? हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

नुकत्याच झालेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नाम साधर्म्य असलेल्या बाबू दराडे या उमेदवाराने जवळपास एक लाख मते घेतली होती. त्यामुळे शिक्षक मतदार संघातही तोच प्रयोग करण्याचा प्रयत्न प्रस्थापितांनी केलेला आहे. दिंडोरी पॅटर्नची ही पुनरावृत्ती लपून राहिलेली नाही.

या माघारीनंतर आमदार किशोर भिकाजी दराडे हे दराडे नाव असलेले एकमेव उमेदवार मैदानात आहे. मात्र कोपरगावचे संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्याशी नाम साधर्म्य असलेले दोन उमेदवार आहेत. सागर कोल्हे आणि संदीप कोल्हे अशी त्यांची नावे आहेत. हे उमेदवार कोणाच्या प्रोत्साहनातून उमेदवारी करीत आहे, असा प्रश्न विरोधकांकडून केला जात आहे. कोल्हे नाव हे दोन्ही उमेदवार देखील बेपत्ता आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे आहेत. त्यांच्याशी नाम साधर्म्य असलेले देखील दोन उमेदवार आहेत. यामध्ये संदीप नामदेव गुळवे आणि संदीप भीमाशंकर गुळवे यांचा समावेश आहे. हे उमेदवार देखील बेपत्ता आहे.

नाशिकच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील हे प्रकार यंदा चर्चेचा विषय आहे. यातून शिक्षकांमध्ये वेगळ्याच संदेश गेला आहे. निवडणूक उमेदवारी माघारीची मुदत अद्याप एक दिवस आहे. या कालावधीत काय घडते याची उत्सुकता शीगेला पोहोचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT