Ahilyanagar anti-drug drive : संगमनेर शहरातील लालबहादूर शास्त्री चौकातील एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेंट या दुकानात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारी इंजेक्शन्स अवैधरित्या विकली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त करून विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
पोलिस (Police) निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखालील उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, कर्मचारी बाबासाहेब सातपुते, विजय खुळे यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी छापा घातल्यावर आदित्य किशोर गुप्ता (वय 24, रा. साईनगर, संगमनेर) हा नशेसाठी लागणारी इंजेक्शन्स विकताना आढळला.
पोलिसांनी त्याच्याकडून 6 हजार 600 रुपयांची नशेची इंजेक्शन्स, 270 रुपयांच्या सिरींज, 80 हजार रुपयांचा मोबाइल, 1 लाख 20 हजार रुपयांची दुचाकी आणि 16 हजार 250 रुपयांची रोख रक्कम, असा एकूण 2 लाख 23 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस फिर्यादीवरून आदित्य गुप्ता याच्यावर संगमनेर (Sangamner) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आमदार सत्यजीत तांबे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या ड्रग्स अन् त्यातून वाढलेल्या गुन्हेगारी विषयी चिंता व्यक्त करणारे पत्र पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना लिहिलं आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सामाजिक आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून राज्यात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. या जिल्ह्याला नुकतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव दिले आहे. मात्र सध्या जिल्ह्यामध्ये गुंडगिरी दहशतवाद अमली पदार्थांची तस्करी वाढली असून पोलिसांचा भाग संपला आहे, तेव्हा पोलिस प्रशासनाने आपला खाक्या दाखवत अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे .
अहिल्यानगर पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या पत्रात आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राबवलेल्या विकासाच्या योजना व केलेले प्रशासन हे कायम दिशादर्शक ठरले आहे. एक उत्तम प्रशासक व जाणकार राज्यकर्त्या म्हणून त्यांची देशाला ओळख असून त्यांचे नाव जिल्ह्यासाठी असणे हे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
एकेकाळी हा जिल्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने राज्यातील आदर्श आणि गुन्हेगारीमुक्त जिल्हा म्हणून ओळखला जात असे. परंतु अलीकडच्या काळात जिल्ह्यात वाढलेली गुंडगिरी, महिलांवरील अत्याचार, चोऱ्या, अवैध धंदे , अमली पदार्थांची तस्करी यामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ झाले आहेत.
ड्रग्सच्या वाढत्या घटना सातत्याने नागरिकांच्या कानावर येत आहे. त्याला पोलिसांचे संरक्षण आहे की काय अशी शंका निर्माण व्हावी इतक्या मोठ्या प्रमाणात सहजरित्या ड्रग्स अगदी खेडोपाडी उपलब्ध होत आहेत. आणि ही बाब उत्तम प्रशासक असलेल्या अहिल्यादेवींच्या नावाने असलेल्या जिल्ह्यासाठी अत्यंत लाजिरवाणी ठरत आहे.
जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आहे की नाही आणि असेल तर ती नेमकी काय करते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर कार्यरत झाले आहेत. हे जिल्ह्याच्या समाजव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक ठरणारे आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये ट्रॅफिकच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ट्राफिक पोलिस यंत्रणा कार्यरत आहे की नाही, अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे.
एकंदरीत जिल्ह्यामध्ये सध्या पोलिस प्रशासनाचा धाक संपलेला आहे. त्यामुळे आता पोलिसी खाक्या दाखवणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी, गुंडगिरी, चोऱ्या ,दरोडे, महिलांवरील अत्याचार, अमली पदार्थांची तस्करी, ट्राफिक समस्या, ड्रग्स चे वाढते प्रमाण हे अत्यंत चिंताजनक आहे. यापूर्वीही जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत मी 29 जुलै 2025 रोजी आपणास स्मरणपत्र दिले होते.
तरी आपण स्वतः पुढाकार घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम बनून पूर्वीप्रमाणे हा जिल्हा आदर्श, गुन्हेगारीमुक्त करावा. तसेच नाशिक शहरात सुरू असलेल्या अभियानासारखा अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा आदर्शवत उपक्रम राबवावा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी पत्राद्वारे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.