Sangamner municipal election : संगमनेर नगरपालिका निवडणुकीत मतदान झालेल्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्यानं गोंधळ उडाला. स्ट्राँग रूमचे कॅमेरे बंद पडल्याची माहिती वाऱ्यासारखी उमेदवार अन् त्यांच्या समर्थकांमध्ये पसरताच, स्ट्राँग रूमच्या बाहेरच मोठी गर्दी झाली होती. संगमनेर सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशानसाच्या हलगर्जीपणावर, 'सत्ताधारी काहीही करू शकतात', असा गंभीर आरोप केला.
दरम्यान, संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दयानंद गोरे यांनी, समाज माध्यमावर पोस्ट शेअर करत, सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची हार्ड डिस्क मेमरी भरली होती. ती बदलण्यात आली. त्यामुळे थोडा गैरसमज झाला. हार्ड डिस्क बदलताना व्हिडिओ शुटिंग करण्यात आलं आहे, असं म्हटलं आहे. तरी देखील या कार्यवाहीबद्दल संगमनेर सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शंका कायम आहे.
संगमनेर (Sangamner) नगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या ईव्हीएम मशिन या क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या स्ट्राँग रूमला पोलिसांचा खडा पहारा आहे. तसंच स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची 24 तास नजर आहे. मतमोजणीला अजून 15 दिवस आहेत. एवढा दिवस या स्ट्राँग रूमवर करडी नजर राहणार आहे. यातच आज सकाळी स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याने राजकीय गदारोळ झाला.
ईव्हीएम मशिन (EVM) ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याची माहिती वाऱ्यासारखी निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार अन् त्यांच्या समर्थकांना कळताच त्यांनी स्ट्राँग रूम बाहेर गर्दी करत, तिथं बंदोबस्तावर असलेल्या पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबती केली. यामुळे एकच गोंधळ सुरू झाला. काही स्ट्राँग रूमबाहेरच्या प्रवेशद्वारावर बसून घेत, प्रशासनाच्या खुलाशाची वाट पाहत बसले. प्रशासनाकडून खुलासा होत नसल्याने शंकांना अधिकच धुमारे फुटले.
संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील ईव्हीएम मशिन ठेवलेली स्ट्राँग रूम आहे. नगरपालिका निवडणुकीतील सर्व 15 प्रभागांतील ईव्हीएम मशिन कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रतिनिधी यांच्या समक्ष सील करण्यात आलेल्या या स्ट्राँग रूमवर सतत देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
स्ट्राँग रूमवरील सीसीटीव्ही कॅमेरे अचानकपणे काही वेळासाठी बंद पडल्याच्या प्रकारावर सर्वात जास्त संगमनेर सेवा समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक होते. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात अन् राज्यात ईव्हीएमबद्दल पूर्वीपासूनच संभ्रम आहे. संगमनेरमध्ये घडलेल्या या प्रकाराने शंकांना अधिक बळ मिळते. कॅमेरे नेमके कशामुळे बंद पडले, याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असलेल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना देऊ शकले नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या.
संगमनेर नगरपालिका मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दयानंद गोरे यांनी समाज माध्यमावर पोस्ट शेअर करत, सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची हार्ड डिस्क मेमरी भरल्याने बदलण्यात आली. त्यामुळे थोडा गैरसमज झाला. हार्ड डिस्क बदलताना व्हिडिओ शुटिंग करण्यात आल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘सत्ताधारी काहीही करू शकतात’ असा गंभीर आरोप करत संगमनेरमध्ये स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे एक तास बंद पडणे, हा प्रकार नेमका काय आहे? याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून अपेक्षित आहे. प्रशासनावर काही वेगळे करण्याचा दबाव, तर नव्हता ना? अशी शंका यामुळे उपस्थित राहते, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.