Sangamner Municipal Council : संगमनेर शहरातील 2009 च्या पाणीपुरवठा योजनेवरून राजकीय वाद रंगला आहे. एकनाथ शिंदे शिवसेना आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे या योजनेत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. त्यानंतर माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी पत्रकार निवेदनाद्वारे या आरोपांना उत्तर दिले आहे.
दुर्गा तांबे यांनी चौकशीचे स्वागत करत, सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच खोटे आरोप करणाऱ्यांचे दावे टिकणार नसल्याचे सांगत त्यांनी आमदार खताळ यांच्या आरोपांवर टीका केली. नगरपालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर वैफल्यातून संगमनेरची (Sangamner) बदनामी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तांबे यांनी सांगितले की, निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी राबविण्यात आलेली पाणीपुरवठा (Water) योजना यशस्वी ठरली असून शहराला नियमित, स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा होत आहे. ही योजना नगरविकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित विभागांच्या मंजुरीनंतरच राबविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
पत्रकानुसार, 5 मे 2009 रोजी यूआयडीएसएसएमटी योजनेसंदर्भात प्रधान सचिवांच्या बैठकीत निवडणूक आचारसंहिता लक्षात घेऊन निविदा प्रक्रिया आणि कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी आवश्यक मंजुरीनंतरच कार्यादेश दिले. तसेच थर्ड पार्टी ऑडिटनंतरच संबंधित देयके अदा करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
योजनेत कोणतीही अनियमितता झालेली नसून अपूर्ण आणि चुकीच्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप दुर्गा तांबे यांनी केला. संगमनेरच्या विकासाचे श्रेय मिळत नसल्याने शहराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.