Shivsena UBT news : महाविकास आघाडीने लोकसभेला एकोप्याने जे कमावले ते विसंवादाने विधानसभेला घालवले. त्याचा फटका आघाडीच्या नेत्यांना बसला आहे. लोकसभेची स्थिती पुन्हा निर्माणच होऊ नये, म्हणून भाजप कंबर कसून कामाला लागला आहे. एक-एक करून तगडे मोहरे भाजपच्या गळ्याला लागत आहेत.
लोकसभा निवडणुकीत नाशिक, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले होते. नंदुरबार आणि धुळे येथे काँग्रेस, दिंडोरीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर नाशिक मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा खासदार झाला. त्यामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. या उत्साहाच्या हवेतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गंभीर चुका केल्या.
नाशिक शहरात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील तीन मतदारसंघ शिवसेना नेते संजय राऊत यांनी अट्टहास आणि इगो यातून मिळविले. यामध्ये देवळाली मतदारसंघात गेली पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक जोरात कामाला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे यांचा मतदार संघावर प्रभाव होता. येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रबळ लढत शक्य होती.
ऐनवेळी संजय राऊत यांनी शेवटच्या क्षणी हा मतदारसंघ स्वतःकडे घेत माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी दिली. मात्र निवडणुकीचे आडाखे आणि यंत्रणा उभारण्यात ठाकरे पक्षाची कोणतीही यंत्रणा त्यांच्या मागे उभी नव्हती. माजी मंत्री घोलप हे देखील किती सक्रिय होते, हा वादाचा विषय आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात केवळ संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि लाडके नेते म्हणून सुधाकर बडगुजर यांनाच उमेदवारी मिळणार अशी हवा होती. त्यामुळे त्यांचा मतदारांमध्ये प्रभाव किती यावर आधीपासूनच मतांतरे होती. तरीही त्यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेचा या दोन्ही मतदारसंघात दारूण पराभव झाला. निवडणुकीचा निकाल लागताच सुधाकर बडगुजर आणि माजी मंत्री बबन घोलप यांनी नुकताच वाजत गाजत भाजप प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेना नेते संजय राऊत यांचा इगो आता चर्चेत आहे. 'ग्राउंड लेव्हल'ला कोणतीही तयारी नसताना फक्त नेत्यांनी सांगायचे आणि संजय राऊत यांनी युती तोडण्याची धमकी देत तो मतदारसंघ आपल्याकडे घ्यायचा, असे घडल्याचे बोलले जाते. महाविकास आघाडीच्या राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये हीच स्थिती होती.
आगामी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसारखी परिस्थिती उद्भवता कामा नये, याचे नियोजन भाजपने आत्तापासून सुरू केले आहे. त्यासाठी प्रतिस्पर्धी आणि पराभूत उमेदवारांना विविध प्रयोग करून भाजप पक्षात घेण्याची जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. महायुतीचे सबंध सरकार आणि भाजपचे सर्व मंत्री त्यासाठी कामाला लागले आहेत.
सध्याच्या रांगा लावून भाजप प्रवेशाच्या राजकारणाकडे पाहता यातून दोनच गोष्टी संभवतात. एकतर भाजप प्रचंड बलवान होऊन विरोधी पक्ष कमकुवत होईल किंवा भाजपच्या स्वतःच्याच चुकीतून नवीन नेतृत्व उभे राहून भाजपची कोंडी होईल. त्यासाठी कोणती घटना कारणीभूत होते, याचे भविष्य सांगणे सगळ्यांनाच कठीण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.