Pravin Darekar- Sanjay Raut
Pravin Darekar- Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संजय राऊतांनी आम्हाला रामभक्ती शिकवू नये!

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी आम्हाला श्रीराम आणि रामभक्ती याविषयी शिकवू नये. भाजप आणि राम (Shreeram) यांच्या श्रद्धेचे अतुट नाते आहे. त्याबाबत जनतेने आमच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे, असे विधना परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सांगितले.

यावेळी श्री. दरेकर म्हणाले, राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तर ऊर्जा खाते कॉंग्रेसकडे असल्याने दोन्ही खात्यांच्या मंत्र्यांमधील वाद व परस्परातील असमन्वयातून राज्यात मोठ्या प्रमाणात विजेचे अघोषित भारनियमन सुरू असून याला सर्वस्वी उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्या विरोधात भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारण्याची घोषणा त्यांनी केली.

भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते दरेकर बोलत होते. ते म्हणाले, वीज टंचाईच्या नावाखाली राज्य सरकारकडून ग्राहकांना लुबाडण्याचा डाव आहे. वीजटंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून अघोषित भारनियमन सुरू आहे. दीड ते सहा तासांपर्यंत वीज गायब असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने लुट सुरू केली आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन सुरू आहे. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी आहे. कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात वीजनिर्मिती संयंत्रे सक्तीने बंद ठेवण्यात आली आहेत. सरकारच्या बेदरकार नितीमुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे. विजेची मागणी कमी असते त्यावेळी देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. परंतु ऐन उन्हाळ्यात देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेऊन सरकारने वीजटंचाईच्या समस्येत भर घातली आहे. सरकारच्या आर्थिक बेशिस्तीला आळा घालण्यासाठी अभ्यास गट नेमण्याची सूचना राज्य वीज नियामक आयोगाने सरकारला चार महिन्यांपूर्वी केली होती. अद्याप मागणीची देखल घेतली नाही.

वीज मंडळ मोडीत काढण्यासाठीच सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. भाजप सत्तेत असताना महाराष्ट्र भारनियमनमुक्त होता. कोळसा टंचाईचे खापर केंद्र सरकारवर फोडले जात आहे. कमाल मागणीच्या तुलनेत सुमारे सहा हजार मेगावॉट विजेचा तुटवडा असताना अन्य क्षेत्रातून जेमतेम १३०० मेगावॉट वीज खरेदी केली जात आहे. सरकारने खरेदी केलेल्या विजेचे पैसेही वेळेवर मिळत नसल्याने राज्य सरकारची पत संपुष्टात आली आहे. थकबाकी वाढत असताना विशेष खासगी पुरवठादारांशी हातमिळवणी करून चढ्या दराने वीज खरेदी करायची व त्याचा भार ग्राहकांच्या माथ्यावर मारून टक्केवारीचे राजकारण करायचे असा सरकारचा हेतू असल्याचा आरोप श्री. दरेकर यांनी केला. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, भाजपच शहराध्यक्ष गिरीश पालवे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT