Bhausaheb Wakchaure in Shirdi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Calls Bhausaheb Wakchaure : ‘गद्दारांना सुरक्षा, शिवसैनिकांना नजरकैद?’ शिर्डीत वाकचौरेंच्या एंट्रीनंतर संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut launches a fierce attack after MP Bhausaheb Wakchaure enters Shirdi amid heavy police security, escalating Maharashtra Shiv Sena political crisis : खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' चिन्ह असलेला पंचा गळ्यात घालून शिर्डीत दाखल झाले.

Pradeep Pendhare

Shirdi political controversy : खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' चिन्ह असलेला पंचा गळ्यात घालून शिर्डीत दाखल झाले.

खासदार वाकचौरे मतदारसंघात दाखल होण्याची चाहूल पोलिस प्रशासनाला मिळताच, संभाव्य तणाव लक्षात घेऊन शिर्डी, कोपरगाव, संगमनेर आणि राहाता परिसरातील शिवसेना ठाकरे सेनेच्या अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याची माहिती समोर आली.

याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते (ShivsenaUBT) खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट करत खासदार राऊत यांनी वाकचौरे यांना 'डरपोक गद्दार', म्हणत सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत, 'अहिल्यानगर पोलिसांना शिवसैनिकांना अटकेत ठेवण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते का? ही सरकारी दहशत आहे का?' असा संतप्त सवाल उपस्थित केला.

खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी पुढे दावा केला की, सकाळी दहा वाजल्यापासून शेकडो शिवसैनिकांना विविध पोलिस ठाण्यांमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले. ज्या मार्गाने बंडखोर खासदार प्रवास करत होते, त्या मार्गांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवून रस्तेही बंद करण्यात आले होते.

दरम्यान, काल रात्री शिर्डीत पोहोचल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. त्यांनी मला नेहमी प्रेम दिलं. मात्र मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेसोबत जाणं आवश्यक होतं.

त्यांच्यावर झालेल्या 50 कोटी रुपयांच्या आरोपांवरही वाकचौरेंनी प्रतिक्रिया दिली. 50 कोटी घेतल्याचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी सत्तेत केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी गेलो आहे. येणाऱ्या प्रकल्पांमधून जनता सत्य पाहील, असा दावा त्यांनी केला.

तसेच संजय राऊतांनी साईबाबांच्या शपथेचा उल्लेख केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्यासाठी मी कधीच साईबाबांची शपथ घेतली नव्हती. संजय राऊत काहीही बोलत आहेत. हात जोडून विनंती करतो, साईबाबांचा विषय यामध्ये आणू नका, असेही वाकचौरे म्हणाले.

बंडखोरीचे सर्वाधिक पडसाद शिर्डीत

महाराष्ट्राच्या राजकारणात सहा खासदारांच्या बंडानंतर सर्वाधिक पहिले राजकीय भूकंपाचे पडसाद थेट शिर्डीत उमटले होते. भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला सोडून एकनाथ शिंदे शिवसेनेध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेत तीव्र संतापाची लाट आहे.

खासदार वाकचौरेंविरोधात शिवसैनिक आक्रमक

खासदार वाकचौरे यांचे नाव बंडखोर खासदारांच्या यादीत समोर येताच, शिर्डीत शिवसेना ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन छेडले. संतप्त शिवसैनिकांनी वाकचौरे यांच्या प्रतिमेला जोडे मारत पुतळा दहन केले. एवढेच नाही, तर 'मतदारसंघात फिरू देणार नाही', असा थेट इशाराही दिला. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी 'लालची कुत्रा', अशा घोषणाही दिल्याने वातावरण अधिकच तापले.

शिर्डीत राजकीय संघर्ष पेटता राहाणार

शिर्डीतून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. सहा खासदारांच्या बंडानंतर शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता रस्त्यावर उतरल्याचे स्पष्ट दिसत असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT